कोल्हापुरात ‘शून्य सावली दिवस’ची अनोखी अनुभूती; ६ मे रोजी ५२ सेकंद सावली अदृश्य प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

कोल्हापुरात ‘शून्य सावली दिवस’ची अनोखी अनुभूती; ६ मे रोजी ५२ सेकंद सावली अदृश्य

माणसाची सावली नेहमी सोबत असते, मात्र ६ मे रोजी ती काही क्षणांसाठी अदृश्य होणार आहे.

Swapnil S

कोल्हापूर : माणसाची सावली नेहमी सोबत असते, मात्र ६ मे रोजी ती काही क्षणांसाठी अदृश्य होणार आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी सुमारे ५२ सेकंदांसाठी ‘शून्य सावली दिवस’चा अनुभव कोल्हापूरकरांना घेता येणार असल्याची माहिती मेन राजाराम प्रशालेचे डॉ. संतोष माने यांनी दिली.

सूर्य नेमका डोक्यावर आल्यानंतर वस्तूची सावली थेट तिच्या पायाखाली पडते आणि काही क्षणांसाठी ती दिसेनाशी होते. या घटनेला ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशांनी झुकलेला असल्यामुळे सूर्य उत्तरायण आणि दक्षिणायन मार्गाने भ्रमण करताना वर्षातून दोन वेळा अशा घटना घडतात. ही घटना कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानच्या प्रदेशातच अनुभवता येते. रोज दुपारी १२ वाजता सावली नाहीशी होते हा सर्वसामान्य समज चुकीचा असून, ही घटना ठराविक दिवसांमध्येच घडते.

या ठिकाणी अनुभवता येणार

कोल्हापूर जिल्ह्यात ४ मे ते ७ मे दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हा अनुभव घेता येणार आहे. आजरा व चंदगड येथे ४ मे, गडहिंग्लज व राधानगरी येथे ५ मे, तर ६ मे रोजी कोल्हापूर शहरासह करवीर, कागल, गगनबावडा, भुदरगड, शिरोळ, हातकणंगले येथे हा अनुभव मिळणार आहे. पन्हाळा व शाहूवाडी येथे ७ मे रोजी ही घटना पाहता येईल. दुपारी साधारण १२.२७ ते १२.३१ या वेळेत सूर्य डोक्यावर येताच सावली पायाखाली येते.

‘शून्य सावली दिवस’ ही खगोलीय घटना असून विज्ञान समजून घेण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते. भारतीय खगोल अभ्यासकांकडून याबाबत जनजागृती केली जात असून नागरिकांनी मैदाने, क्रीडांगणे किंवा घरांच्या छतावर उभे राहून हा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी ही एक अनोखी आणि रोमांचक वैज्ञानिक पर्वणी ठरणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.
- डॉ. संतोष माने

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद