कराड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी व वरदायिनी असलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरण, धरणाच्या छ. शिवाजी महाराज जलाशयात गुरुवारी दुपारी ३ वाजता १०५.२५ टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याने पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या दोन वक्र दरवाजांची दारे एक फुटाने वर उचलून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते, मात्र पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी ९ वा. दोन्हीही वक्र दरवाजे बंद करण्यात येऊन केवळ पायथा वीजगृहातून एक जनित्र सुरू करून वीज निर्मिती करून १०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
सध्या धरण परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी धरणात आता २ हजार ६३८ क्यूसेक्स पाण्याची आवक सुरूच आहे.
महाराष्ट्राला मोठा दिलासा...
पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे कोयना धरण कधी भरते याकडे लागते. कोयना धरणाच्या माध्यमातून सुमारे २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील जवळपास ६७ टीएमसी पाण्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जातो. तर राज्यातील पूर्वेकडे सिंचनासाठी ३० टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती व सिंचन अवलंबून आहे. त्यामुळेच तर कोयना धरणाला भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. यावर्षी कोयना धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभर राज्याचा वीज व सिंचनाचा प्रश्न मिटला असल्याने महाराष्ट्र राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.