पुणे : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत, अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यावर त्यांनी बोलणे टाळले.
‘लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही. मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या. ही योजना लागू होणार नाही, अशा काही महिलांनी अर्ज केले. त्यांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही. परंतु, यापुढे केवळ पात्र महिलांना मदत दिली जाईल,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटे गृहित धरून अर्थसंकल्पात तरतूद केलेली असते. केंद्र सरकारकडूनही मदत मिळते. पंचनामे झाल्यानंतर प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल,’ अशी माहिती पवार यांनी दिली.
कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता, ‘शेतकऱ्यांबाबत वक्तव्ये करू नका, असे माणिकरावांना सांगितले आहे. शेतकरी सर्वांचा पोशिंदा आहे. काही गोष्टी बोलायच्या नसतात. माणिकरावांना मनात ठेवायची सवय नाही; पण मला ते महागात पडते,’ अशी टिप्पणी पवार यांनी कोकाटे यांच्यासमोर केली. ‘सदाशिव पेठेतील अपघाताची माहिती घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी राज्य आयोगाला विनंती करू,’ असे ते म्हणाले.
नागालँडच्या आमदारांवर कारवाई नाही
नागालँडचे सात आमदार मध्यंतरी भेटून गेले. कामे होत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. सत्ताधाऱ्यांना समर्थन आहे. मी त्यांच्याशी बोलतो, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मध्यस्थी करण्यास सांगितले होते. मात्र, आता सातही आमदारांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईचा प्रश्न येत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागालँडमधील राजकीय घडामोडींवर दिली.
बीडचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तक्रार आली, तेव्हा तिथल्या अधीक्षकांनी काही शस्त्र परवाने रद्द केले. पुण्यात दोन वर्षांत ६५० परवाने कोणाला दिले, त्यांची पार्श्वभूमी काय, निकष काय, ही पडताळणी करून परवाने रद्द करण्यात येतील. लाडक्या बहिणींना सांगायचे आहे की, कायदे तुमच्या बाजूने आहेत; पण तक्रार केल्याशिवाय कारवाई करता येत नाही. - अजित पवार, उपमुख्यमंत्री