ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते यांचं निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असं असताना मॅटचा निकाल विरोधात गेल्याने संजीव ठाकूर पदमुक्त होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना पदमुक्त करण्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश म्हणजे धुळफेक असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे दोन्ही डॉक्टर दोषी आढळल्याने चौकशी समिती यांच्यावर काय कारवाई करते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार दसस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवलं आहे. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. ठाकूर यांच्या सांगण्यावरुन डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचं हे कृत्य वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला अनुसरुन नव्हतं.
दरम्यान, ललित पाटीलसह त्यांच्या टोळीवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे. असं असताना या टोळीत ससूनमधील दोन्ही डॉक्टरांचा देखील समावेश करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ललित पाटीलचा ससूलमध्ये मुक्काम वाढाला यासाठी प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही डॉक्टरांचा त्यांच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये देखील समावेश होता का याचं उत्तर पुणे पोलीसांना द्यायचं आहे.