कांद्याचे दर कोसळले; पाच दिवसांत प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये निराशा 
महाराष्ट्र

कांद्याचे दर कोसळले; पाच दिवसांत प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये निराशा

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांदा नगरी लासलगाव बाजार समितीत पांच दिवसात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण झाली आहे.

Swapnil S

लासलगाव : देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांदा नगरी लासलगाव बाजार समितीत पांच दिवसात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होत असून त्याचा फटका देशांतर्गत बाजारभावाला बसत असल्याचे व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या बुधवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५७०० रुपयांचा दर मिळाला होता. पांच दिवसात दरात मोठी घसरण होऊन मंगळवारी कमाल दर ४ हजार ८७१ रुपयांपर्यंत घसरला आहे. कांदा उत्पादनासाठी मोठा खर्च आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे.

लासलगाव बाजार समितीत आज ४८३ वाहनांमधून ६०९२ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान १३११ रुपये, तर कमाल ४७८१ रुपये सरासरी ४२५० बाजार भाव मिळाला.

उन्हाळ कांद्याला किमान १ हजार रुपये, कमाल ४१८१ रुपये सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.

पांच दिवसात लाल कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपये, तर सरासरी दरात ४५० रुपये आणि उन्हाळ कांदा किमान दरात ३५४ रुपये सरासरी दरात २०० रुपयांनी कोसळले आहे.

उत्पादन खर्च भरून निघणे कठीण

एकीकडे पाण्याअभावी कांद्याचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याच्या दरात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

यंदा सात एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती . पाण्याअभावी पाच एकरांतील पीक सोडून द्यावे लागले. दोन एकरांतील कांदा टँकरच्या पाण्यावर जगवला. आज कांद्याला ३५०० रुपये भाव मिळाला. आठ दिवसांत १ हजार ४०० रुपयांची घसरण झाली. दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च कसा भागवायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
अजित गाडे, कांदा उत्पादक, तळेगाव रुई

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?