विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीचे १५ जागांवर एकमत; काँग्रेस ८, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३ जागा लढवणार 
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक : महाविकास आघाडीचे १५ जागांवर एकमत; काँग्रेस ८, शिवसेना ४, राष्ट्रवादी ३ जागा लढवणार

विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या  जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच व लॉबिंग सुरू असताना शुक्रवारी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे मात्र १५ जागांवर एकमत झाले आहे.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या    जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच व लॉबिंग सुरू असताना शुक्रवारी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे मात्र १५ जागांवर एकमत झाले आहे. नांदेड आणि नाशिकच्या जागांवर तीन्ही पक्षांनी दावा केल्याने या दोन जागांवरून  आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. आघाडीच्या जागावाटपानुसार काँग्रेसच्या वाट्याला ८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ४ तर  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला ३ जागा आल्या आहेत. दरम्यान, सत्ताधारी महायुतीचे जागावाटपाबाबतचे गुऱ्हाळ सुरूच आहे.

विधान परिषदेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना  ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर तर    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या  खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत आघाडीच्या नेत्यांनी विधान परिषदेचे जागावाटप घोषित केले.

‘विधान परिषदेच्या    १७ जागांपैकी १५ जागांबाबत आमचा निर्णय झाला आहे. कोणता पक्ष कोणती जागा लढवेल यावर आमचे एकमत झाले आहे. मात्र, दोन जागांबाबत आमची अद्याप चर्चा सुरू आहे. येत्या    दोन दिवसांत उर्वरित    दोन जागांबाबत आमचा अंतिम निर्णय होईल’, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितले. तर नांदेड आणि नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा वगळता इतर १५ जागांबाबत आम्ही निर्णय जाहीर केला आहे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांची पळवापळवी सुरू : सपकाळ

विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून नगरसेवकांची पळवापळवी सुरू असल्याचा  आरोप सपकाळ यांनी यावेळी केला. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचे घोडेबाजारात रूपांतर झाल्याची टीकाही त्यांनी केली.

महाआघाडीतील जागावाटप

  • काँग्रेस : नागपूर, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, यवतमाळ, भंडारा- गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड

  • शिवसेना ठाकरे गट : रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : पुणे, ठाणे , सांगली-सातारा

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू