महाराष्ट्र

अव्वल शैक्षणिक संस्थासह नागपूरला विकसित करू - देवेंद्र फडणवीस

ज्ञान हीच खरी मोठी शक्ती आहे. भारतातील युवकांनी आयटीच्या क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावून जागतिक पातळीवर आपला अपूर्व ठसा निर्माण केला आहे.

Swapnil S

नागपूर : अखिल भारतीय पातळीवरील नावाजलेल्या सर्व क्षेत्रातील संस्था नागपुरात याव्यात, इथल्या गुणवंताना अशा संस्थामधून संधी मिळावी यासाठी सुरुवातीपासून आमची आग्रही भूमिका राहिली आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भक्कम साथ दिली. या प्रयत्नातून नागपूर येथे एम्स, भारतीय तंत्रज्ञान संस्थान, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या संस्था इथे साकारता आल्या. यातील एक असलेल्या ट्रिपल आयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे लोकार्पण हे सर्वांसाठी गौरवाचा क्षण असून मानवी संसाधनातही नागपूर सर्वोत्तम केंद्र म्हणून ओळखल्या जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बुटीबोरी जवळील वारंगा येथे सुमारे शंभर एकर परिसरात साकारलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था व परिसराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आयआयटीचे संचालक डॉ.ओमप्रकाश काकडे, कुलसचिव कैलास डाखले व इतर मान्यवर उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानातून आपल्या युवकांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ही प्रगती साध्य करताना नव्या पिढीने आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत नवीन संस्कारही रुजवून घेतले. स्पीड ऑफ डेटा व स्पीड ऑफ ट्रॅव्हल्सची अनुभूती आज प्रत्येक व्यक्ती घेत आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी भारतात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भक्कमपणे उभारुन त्याला गती दिल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून अलीकडच्या काही वर्षात भारताने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपण संपूर्ण जगात पाचव्या स्थानावर असून येत्या चार वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून गणला जाईल असा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण भारताच्या प्रत्येक गावांना ४जी व ५जी तंत्रज्ञानाची अनुभूती दिली आहे. लवकरच ६जी तंत्रज्ञान भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले असेल असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील विकासाच्या वाटा या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भक्कम होणार आहेत हे ओळखून आपली योग्य दिशेने वाटचाल सुरु असल्याचे ते म्हणाले.

नागपूर हे आर्टीफिशियल इंटिलिजिन्सचे सेंटर फॉर एक्सलन्स व्हावे यासाठी गुगलसमवेत करार करुन आपली वाटचाल सुरु असल्याचे ते म्हणाले. नव्या शैक्षणिक संस्था लक्षात घेऊन मेट्रोसह सहापदरी मार्गाची सुविधा देण्याचे नियोजन - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतात एकूण २० ट्रीपल आयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था काही वर्षांपूर्वी साकारण्याचा धोरणात्मक निर्णय भारत सरकारने घेतला होता. तेव्हाच ही संस्था नागपुरात साकारावी यासाठी मी आग्रह धरला. मात्र या संस्थेसाठी किमान शंभर एकर जागा उपलब्ध करुन देण्याची अट केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी ठेवली. देवेंद्र फडणवीस तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना नागपुरात येऊ घातलेल्या या संस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा केली. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करुन अत्यंत कमी कालावधीत ही जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नागपुरात ही संस्था प्रत्यक्षात येऊ शकली, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

ज्ञान हीच खरी मोठी शक्ती आहे. भारतातील युवकांनी आयटीच्या क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावून जागतिक पातळीवर आपला अपूर्व ठसा निर्माण केला आहे. संपूर्ण जगात आयटीच्या क्षेत्रात सर्वाधिक मनुष्यबळ हे भारताचे आहे. अधिकाधिक रोजगाराच्या निर्मितीसाठी चांगल्या कंपन्या निर्माण होणे हे आवश्यक असून विविध उद्योजकांना पायाभूत सुविधाही आपण दिल्या पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असून मिहानचा विस्तार गुमगाव व इतर भागात करता येईल का याबाबत चाचपणी सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांचा विकास आपण उत्तम प्रकारे साध्य करू शकलो. यासमवेत स्थानिकांचा विकास आणि संधी यावर प्राधान्याने काळजी घेवू असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक ओमप्रकाश काकडे यांनी केले. संस्थेचे कुलसचिव कैलास डाखले यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी