मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाला लक्ष्य केले. भाजपला मदत करणे म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह केल्यासारखे आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केली. तर राष्ट्रवादीचा जन्मच सत्तेसाठी झाला असल्याचा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या टीकेमुळे महाविकास आघाडीत दुफळी माजल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदी सरकारने मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर करण्याची तयारी केली आहे. या विधेयकाला पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी जाहीर केले. शरद पवार पक्षाच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस आणि ठाकरे गटाने टीकास्त्र सोडले.
१५० कोटींचा गंभीर आरोप
विधेयकाच्या समर्थनासाठी खासदारांची खरेदी-विक्री सुरू असून विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी खासदारांना प्रत्येकी १५० कोटींची ऑफर दिली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. यापूर्वी ५० खोके अशी घोषणा होती, आता १५० खोक्यांच्या घोषणा ऐकायला मिळतील. अमित शहांनी राजकारणाचा व्यापार केला असून राष्ट्रीय घोडेबाजार स्टॉक एक्स्चेंज सुरू केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, अशी टीकाही त्यांनी केली.
पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पुरोगामी विचारांवर आयुष्यभर राजकारण केले. अशा नेत्याकडून जातीयवादी व धर्मांध शक्तीशी हातमिळवणी होईल, असे कधी वाटले नव्हते. मात्र, पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे, हे जनतेला माहिती आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राऊत यांनी दिला इशारा
महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे मित्रपक्षांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेणे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिल्यास इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत त्यांना स्थान राहणार नाही, असेही त्यांनी सुनावले.