महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर 
महाराष्ट्र

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून लौकिक असलेल्या महाबळेश्वर-पाचगणीची स्ट्रॉबेरीचे आगार अशीही स्वतंत्र ओळख आहे. या पारंपरिक फळपिकाच्या लागवडीसाठी पावसाने पूर्णपणे उसंत घेताच शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस आणि पोषक हवामान लाभल्याने भरघोस उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे.

Swapnil S

रामभाऊ जगताप / कराड

जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून लौकिक असलेल्या महाबळेश्वर-पाचगणीची स्ट्रॉबेरीचे आगार अशीही स्वतंत्र ओळख आहे. या पारंपरिक फळपिकाच्या लागवडीसाठी पावसाने पूर्णपणे उसंत घेताच शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस आणि पोषक हवामान लाभल्याने भरघोस उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, ऐन लागवड हंगामात जाणवणारी तीव्र मजूर टंचाई, वाढलेले रोजंदारीचे दर, खते-औषधांचे वाढलेले भाव आणि आयात केलेल्या रोपांचा खर्च यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीसह भिलार, राजपुरी, खिंगर, आंब्रळ, दानवली, कासवंड, भोसे, पांगारी, अवकाळी, गुरेघर आणि मेटगुताड या प्रमुख भागांत सध्या शेतकरी जमिनीची नांगरणी, वाफे तयार करणे, मल्चिंग पेपर अंथरणे, ठिबक सिंचनाची जोडणी आणि शेणखत टाकण्याच्या कामांत व्यस्त आहेत.

शेजारील वाई आणि जावळी तालुक्यांतही मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी रोपांची निर्मिती केली जाते. तेथून महाबळेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये लागवडीसाठी रोपे आणली जात आहेत. योग्य वेळी लागवड झाल्यासच पर्यटनाच्या मुख्य हंगामात बाजारात स्ट्रॉबेरी उपलब्ध होते. त्यामुळे उपलब्ध मजुरांच्या मदतीने शेतकरी लागवडीचा वेग वाढवत आहेत.

मात्र, एकाच वेळी सर्वत्र लागवडीची कामे सुरू झाल्याने परिसरात मजुरांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, रोजंदारीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाई आणि जावळी तालुक्यांत रोपनिर्मितीच्या कामासाठी मजुरांची मागणी वाढल्याने महाबळेश्वर तालुक्यात लागवडीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मजुरी देऊन परजिल्ह्यांतून कामगार आणावे लागत आहेत. यामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आणखी भर पडत असून शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे.

योग्य वेळेत लागवड होणे गरजेचे

परदेशातून आयात केलेल्या मदर प्लँट्सपासून तयार केलेली रोपे सध्या लागवडीसाठी वापरली जात आहेत. योग्य वेळेत लागवड पूर्ण झाल्यास पर्यटन हंगामाचा थेट फायदा मिळतो आणि आर्थिक गणित जुळण्यास मदत होते. मात्र, यंदा रोपांचे वाढलेले दर, खते आणि मजुरीच्या खर्चातील मोठी वाढ यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच ऐन लागवडीच्या काळात मजुरांचा मोठा तुटवडा भासत असल्याने हा प्रश्न कसा सोडवायचा, ही चिंता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

पर्यटन अर्थव्यवस्थेचा कणा

स्ट्रॉबेरी हे केवळ फळपीक नसून महाबळेश्वर-पाचगणीच्या पर्यटन अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. हंगाम सुरू होताच महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर शेकडो स्ट्रॉबेरी विक्री केंद्रे सुरू होतात. पर्यटकांकडून ताज्या स्ट्रॉबेरीबरोबरच जॅम, जेली, आइस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम यांसारख्या प्रक्रियायुक्त पदार्थांना मोठी मागणी असते. यंदा उत्पादन चांगले झाल्यास शेतकऱ्यांसह स्थानिक विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित अन्य घटकांनाही आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.

परदेशी रोपांचा वाढता खर्च

दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी परदेशातून उच्च प्रतीच्या विविध जातींच्या मदर प्लँट्स आयात करून कमी पावसाच्या भागात त्यांची रोपनिर्मिती करतात. ही रोपे योग्य वेळी शेतात लावल्यास पर्यटनाच्या मुख्य हंगामात फळे विक्रीसाठी उपलब्ध होतात आणि शेतकऱ्यांना चांगला आर्थिक परतावा मिळतो.मात्र, परदेशी रोपांचे वाढलेले दर, खते, औषधे, मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा खर्च, त्यातच वाढलेली मजुरी यामुळे स्ट्रॉबेरीची शेती दिवसेंदिवस महागडी होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता