दोन वर्षांत १.१७ लाख महिला बेपत्ता; ३१ हजार महिला अद्याप सापडल्या नाहीत 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

दोन वर्षांत १.१७ लाख महिला बेपत्ता; ३१ हजार महिला अद्याप सापडल्या नाहीत

गेल्या दोन वर्षांत २०२४ आणि २०२५ मध्ये राज्यातील १,१७,३६९ महिला बेपत्ता झाल्याची राज्य पोलिसांकडे नोंद होती. यापैकी ३१,१४१ महिला अद्याप सापडलेल्या नाहीत, अशी माहिती विधानसभेत मंगळवारी देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन वर्षांत २०२४ आणि २०२५ मध्ये राज्यातील १,१७,३६९ महिला बेपत्ता झाल्याची राज्य पोलिसांकडे नोंद होती. यापैकी ३१,१४१ महिला अद्याप सापडलेल्या नाहीत, अशी माहिती विधानसभेत मंगळवारी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार असून याबाबतच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती सभागृहात देण्यात आली. बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये २३,४२९ अल्पवयीन असून त्यापैकी १८,७७० जणींचा शोध घेण्यात यश आले, तर ४,६५९ मुली अद्याप बेपत्ता आहेत.

तसेच गेल्या दोन वर्षात ९३,९४० प्रौढ महिला बेपत्ता झाल्या, त्यापैकी ६७,४५८ महिला सापडल्या. तर २६,४८२ महिलांचा शोध अद्याप लागलेला नाही. याबाबतचा प्रश्न मंगेश कुडाळकर (शिवसेना), प्रशांत ठाकूर (भाजप), विजय वडेट्टीवार (कॉंग्रेस), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी, शप) व अन्य ३२ सदस्यांनी उपस्थित केला होता.

दोन वर्षातील तपशीलवार माहितीनुसार, २०२४ सालात ४५,६६२ महिला बेपत्ता झाल्या होत्या, त्यापैकी ३०,८७७ महिला सापडल्या. यामध्ये ११,३१३ मुली अल्पवयीन होत्या. त्यापैकी ८,४७५ मुली सापडल्या. २०२५ मध्ये ४८,२७८ महिला बेपत्ता झाल्या होत्या, त्यापैकी ३६,५८१ महिलांना शोधण्यात यश आले. यामध्ये १२,११३ मुली अल्पवयीन होत्या. त्यापैकी १०,२९५ मुलींना शोधण्यात यश आले.

अन्य आकडेवारीनुसार, १५ ते १८ वर्ष वयोगटातील ४,९८९ किशोरवयीन मुली मुंबई, नवी मुंबई व लगतच्या रायगड, नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधून बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ९६ टक्के म्हणजे ४,८१३ मुली सापडल्या.

महाराष्ट्रात ९,०७२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी; २३१ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग मंजूर

VSR वर कारवाई; अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ॲक्शन मोडमध्ये; चार विमानांच्या उड्डाणावर बंदी

अपघातग्रस्त विमानाचा ३००० तासांचा रेकॉर्डच उपलब्ध नाही! रोहित पवारांच्या X वरील दाव्याने खळबळ; चौकशी लांबवली जात असल्याची शंका

पुरवणी मागणीतील बेशिस्तीला लगाम; केवळ ११,९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

ट्रम्प यांची इराणला थेट लष्करी कारवाईची धमकी; बैरुतमध्ये हालचालींना वेग; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा रद्द