मुंबई : कर्जत येथील टोरंट प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीला जोरदार विरोध होत असताना राज्यात जवळपास ३५ हजार मेगावाॅट क्षमतेचे एकूण २३ उपसा जलविद्युत प्रकल्प (पंप्ड स्टोरेज) प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांना अंतिम मान्यता मिळाल्यास नजीकच्या काळात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मंगळवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून राज्यात प्रास्तवित असलेल्या २३ जलविद्युत प्रकल्पांची यादी प्रसिद्ध केली. हे प्रकल्प रायगड, पुणे, सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यात होऊ घातले आहेत. २३ पैकी २ प्रकल्पांचे बांधकाम सध्या सुरू आहे, तर काही प्रकल्प पर्यावरण मंजुरीच्या टप्प्यात आहेत.
महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न...
राज्यात साईडोंगर हा एकमेव प्रकल्प नाही. महाराष्ट्रात असे तब्बल २३ पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत. मग प्रत्येक ठिकाणी जनतेने आंदोलन करायचे आणि सरकारने प्रकल्पांचे समर्थन करायचे का? प्रत्येक भागाची भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती वेगळी आहे. पण सरकारला त्याचे काही देणेघेणे आहे की नाही? पर्यावरणाचा विचार न करता प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा आणि जनतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवायचे, हाच सरकारचा विकास आहे का?असा सवाल करत कुंभार यांनी, प्रश्न एका साईडोंगरचा नाही तर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्याचा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रास्तवित प्रकल्प व विद्युत क्षमता
एनएचपीसी, सातारा आणि रायगड (२४०० मेगावॅट ), टीएचडीसी इंडिया लिमिटेड, पुणे आणि ठाणे (१२०० मेगावॅट), अदानी हायड्रो एनर्जी, अमरावती (१५०० मेगावॅट), एनटीपीसी, रायगड (११०० मेगावॅट), रिन्यू हायड्रो पॉवर प्रा. लि. पुणे ( ६०० मेगावॅट), मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (२००० मेगावॅट), अवाडा हायड्रो पॉवर, पुणे आणि रायगड (१५०० मेगावॅट), जेएसडब्ल्यू एनर्जी, ठाणे आणि नाशिक (१५०० मेगावॅट), टाटा पॉवर कंपनी, पुणे आणि रायगड (१००० मेगावॅट), टाटा पॉवर कंपनी, पुणे (१८०० मेगावॅट), अदानी ग्रीन एनर्जी , ठाणे आणि पुणे (१५०० मेगावॅट), रिन्यू सोलर पॉवर प्रा. लि., पुणे (१००० मेगावॅट), जेएसडब्ल्यू एनर्जी रायगड आणि पुणे (१५०० मेगावॅट), अदानी ग्रीन एनर्जी, सातारा (१५०० मेगावॅट ), टोरंट ३ पुणे आणि रायगड (३००० मेगावॅट), टोरंट ४ पुणे आणि रायगड (१२०० मेगावॅट), अदानी ग्रीन एनर्जी , सातारा (२७०० मेगावॅट), रित्विक प्रोजेक्ट, कोल्हापूर (१२०० मेगावॅट), अदानी ग्रीन एनर्जी, पुणे आणि रायगड (१५०० मेगावॅट), अदानी ग्रीन एनर्जी,सिंधुदुर्ग ( २१०० मेगावॅट), ग्रीन्को एनर्जी, छत्रपती संभाजीनगर (२००० मेगावॅट), ग्रीन्को एनर्जी,छत्रपती संभाजीनगर (८०० मेगावॅट), या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
सत्ताधारी नेत्यांचा विरोध
जलविद्युत प्रकल्पांना आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सयाजी शिंदे यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही कर्जत येथील जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत होत असून ‘एल-निनो’च्या संकटाला महाराष्ट्र वृक्षतोडीमुळेच तोंड देत आहे. झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी १०० ते १५० वर्षे लागतात. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभा करण्यासाठी आधी एक झाड तोडले, तर १०० झाडे लावावी आणि मगच वृक्षतोड करून प्रकल्प उभे करावेत, अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी केली आहे.
'राज्यात उपसा जलविद्युत प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. आताच्या २३ प्रकल्पांमुळे आणखी किती डोंगर,किती झाडे नष्ट होणार? अशाने महाराष्ट्राचे वाळवंट होईल. आपल्या डोळ्यादेखत निसर्गाचा विनाश होत असल्याने याविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे'अभिनेते सयाजी शिंदे