मुंबई : सर्वसामान्य आणि ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात तसेच प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे, यासाठी २१ जिल्ह्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय ४ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन केली जाणार आहेत. महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी तालुक्यातील अनुक्रमे चेंबूर, मालाड आणि वांद्रे येथे तर नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातील नामपूर येथे नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालय सुरु होईल. प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देण्यासाठी चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये चार नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली. पुण्यातील बारामती, सोलापुरातील पंढरपूर, रत्नागिरीतील दापोली आणि नागपूरमधील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहेत.
कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी आणि कर्मचारीवृंद, तालुक्यांचे तसेच जिल्ह्यांचे अंतर, लोकसंख्या व नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.