कल्पेश म्हामुणकर/मुंबई
दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्यादी अतिथीगृहात गुप्त भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीस, शिंदे, अजितदादा या महायुतीतील तीन प्रमुख नेत्यांमध्ये शनिवारी रायगड किल्ल्यावर जवळपास एक तास बैठक झाली असताना लगेचच पुढच्या दिवशी शिंदेंसोबत बैठक घेण्याचे कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अमित शहांच्या दरबारी शिंदे गटाचे वजन वाढले असतानाच, पुन्हा एकदा शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे शब्द टाकल्याचे समजते. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शिंदे गटाच्या नेत्यांच्या फाईली रखडवण्याचे काम होत असतानाच, या दोन प्रमुख मुद्द्यांवर शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा झाल्याचे समजते.
शहांसोबतच्या बैठकीनंतर शिंदे प्रसारमाध्यमांशी म्हणाले की, “अमित शहांसोबत बैठक करण्यात चुकीचे काय? शहा हे एनडीए आणि महायुतीचे मोठे नेते आहेत. ही राजकीय भेट नव्हती. आम्ही फक्त राजकारणावरच चर्चा करतो, असे नाही.”
अमित शहांसोबतची बैठक आटोपल्यानंतर शिंदेंनी फोन करून रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या भरत गोगावले यांना थेट रायगडवरून बोलावून घेतले. तेसुद्धा भरदुपारी मुंबईत पोहोचल्यानंतर शिंदेंच्या भेटीसाठी गेले. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंदे दरबारी पोहोचले. सामंत म्हणाले की, “मी येथे एकनाथ शिंदेंना भेटायला आलो आहे. शिंदेंनी आम्हाला काही सांगितले, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मात्र शिंदेंची शहांसोबतची बैठक ही महाराष्ट्राचा विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची होती.”
शिंदेंनी माझी तक्रार केली असेल असे वाटत नाही - अजितदादा
बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची तक्रार केल्याचे म्हणणे खुद्द अजितदादांनी खोडून काढले. “अमित शहा यासंदर्भात माझ्याशी काहीही बोलले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. जर शिंदेंना काही म्हणायचे होते तर ते माझी तक्रार नक्कीच करणार नाहीत. ते मुख्यमंत्री फडणवीस किंवा माझ्याशी थेट बोलू शकले असते. आमच्यात चांगले संबंध आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा लवकरच निकाली निघेल. त्यासंदर्भात तोडगा निघाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल.”