विजय पाठक/जळगाव
जिल्ह्यातील युतीच्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल भाईदास पाटील या तीन मंत्रीगणांवर दिली असली तरी महाविकास आघाडीने या तीनही जणांना आपापल्या मतदारसंघात खिळवून ठेवल्याने जिल्ह्यात प्रचारासाठी फिरणे कठीण झाले आहे.
जिल्ह्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील तर अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील असे तीन मंत्री आहेत. या तिघा मंत्र्यांवर युतीचा प्रचार आणि जिल्ह्यातील अकराही जागा जिंकून आणण्याची जबाबदारी टाकलेली आहे. या तीनही मंत्रीगणांना आपल्या मतदारसंघातच कडवा विरोध असल्याने विरोधकांनी त्यांना त्यांच्याच मतदारसंघात खिळवून ठेवले आहे. जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांचे गिरीश महाजन यांना कडवे आव्हान आहे. महाजनांनी जामनेर मतदारसंघाचा विकास केला नसल्याचा खोडपे यांनी दावा केला आहे. सिंचनाची कामे झाली नाहीत, उद्योगधंदे नाहीत, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नसून जामनेर हा विकासापासून दूर असल्याचे खोडपे यांनी म्हटले आहे. तर महाजन हे आपण जामनेरचा विकास केल्याचा दावा करत आहेत.
अजित पवार गटाचे राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा अमळनेर हा मतदारसंघ असून त्यांच्यासमोर काँग्रेसचे अनिल शिंदे, अपक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांचे आव्हान आहे. अमळनेरकडे मोठ्या प्रमाणावर झालेले दुर्लक्ष, २५ वर्षापासून अपूर्ण राहीलेले पाडळसे हे धरण, या धरणासाठी निधी उपलब्ध केला गेला नाही, सामान्य कार्यकर्त्यांना अनिल पाटील भेटत नसल्याच्या तक्रारीची बोंब विरोधकांनी उठवली आहे. विरोधकांनी प्रचारात आघाडी घेतल्याने अनिल पाटलांची चांगलीच दमछाक होत आहे.
गेल्या तीन निवडणुकीत प्रत्येकवेळी नवा प्रतिनिधी निवडून देणाऱ्या या मतदारसंघात यंदा कोणाला निवडून देणार याकडे लक्ष लागले आहे. कोणत्याही स्थितीत गुलाबराव निवडून येऊ नयेत म्हणून ठाकरे गटाने ताकद लावली आहे. निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी दोन दोन वेळा दौरे केले. जळगाव ग्रामीणची जागा ठाकरे गटाला सुटली नसून शरद पवार गटाला सोडण्यात आली आहे.
बंडखोर गुलाबराव पाटील यांच्यासोबत
आघाडी धर्म सांगत शरद पवार, संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी धरणगावला सभा घेतल्यातर गुलाबराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा जळगाव ग्रामीणचे दौरे केले, सभा घेतली. शरद पवार गटाकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर हे निवडणूक लढवत असून यापूर्वी देवकरांना २०१४ आणि २०१९ मध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात असलेले बंडखोर यंदा त्यांच्यासोबत असल्याने गुलाबराव पाटलांची स्थिती चांगली असली तरी ते कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
संघाचे कार्यकर्ते महायुतीसाठी मैदानात
जिल्ह्यातील हे नेते आपापल्या मतदारसंघात अडकून पडल्याने शरद पवार खासदार अमोल कोल्हे, एकनाथ खडसे यांना आघाडीकडून प्रचारास उतरावे लागले तर महायुतीसाठी अमित शाह यांचे दोन दौरे झाले. काँग्रेसच्यावतीने अद्याप कुणीही आलेले नाही. जिल्ह्यात भाजपचे केडर मजबूत असून यंदा त्यांची महायुतीच्या उमेदवारांना चांगली साथ मिळत आहे. याशिवाय संघाचे कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने महायुतीसाठी प्रचारास उतरले आहेत.