संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीचा प्रत्येकी ८५ जागांचा फॉर्म्युला ठरला, असे दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र...

Swapnil S

मुंबई : महाविकास आघाडीचा प्रत्येकी ८५ जागांचा फॉर्म्युला ठरला, असे दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र, आता त्यात वाढ करून 'मविआ'तील तिन्ही प्रमुख पक्षांनी 'नाईन्टी'वर (९० जागा) समाधान मानण्याचे ठरवले आहे. तीनही पक्ष आता प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तर उर्वरित १८ जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मविआत जागावाटपावर एकमत झाल्याचे 'मविआ' नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. काही जागांवर तिढा कायम असला तरी लवकरच जागांचा तिढा सुटेल, असेही 'मविआ' नेत्यांनी वेळोवेळी सांगितले. मात्र, 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने महायुतीने यावरून मविआवर लक्ष्य केले होते. त्यामुळे 'मविआ'चे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निर्देशावरून मविआने दोन दिवसांपूर्वी घाईघाईने प्रत्येकी ८५ जागांचा फॉर्म्युला पत्रकार परिषद घेत जाहीर केला. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपाबाबत 'मविआ'त रस्सीखेच सुरूच होती.

शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसला शंभरावर जागा हव्या होत्या. त्यामुळे त्यांच्यात बरीच तणातणी सुरू होती. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक चकमकही झडली होती. त्यामुळे 'मविआ'त कोण मोठा भाऊ होणार याबाबत बरीच उत्सुकता होती. पण अखेर 'मविआ'तील या तिन्ही पक्षांनी समसमान जागावाटपाचे सूत्र स्वीकारून संघर्ष टाळल्याचे दिसत आहे.

शुक्रवारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आता ९० ९० - ९० असा 'मविआ'चा नवा फॉर्म्युला ठरला आहे. उर्वरित १८ जागा मित्र पक्षांसाठी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सक्षम उमेदवार देणार!

महाविकास आघाडी कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नाही. काँग्रेस पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. ही राज्याची निवडणूक आहे, काही अडचणी आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही थोरात म्हणाले.

'सपा'चा वेगळी चूल मांडण्याचा इशारा

'मविआ'ने विधानसभेसाठी सपाला ५ जागा न सोडल्यास आम्ही २५ जागांवर उमेदवार उभे करू, असा इशारा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिला असल्याचे समजते.

कमी जागांमुळे राहुल गांधी नाराज

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत, महाराष्ट्रात जागावाटपात योग्य पद्धतीने वाटाघाटी केल्या नसल्याबद्दल राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. याबाबत नाना पटोले यांना दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, आमच्या पक्षाला मेरिटच्या आधारावर जास्त जागा हव्या होत्या, पण आमची तीन पक्षांची आघाडी असल्याने हा घोळ झाला. आम्ही त्यांना त्या पद्धतीने समजून सांगितले. त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले".

मी शिवसेनेसोबतच - सुधीर साळवी

"मी कालही पक्षासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही पक्षासोबत राहणार", असे शिवसेनेचे (उबाठा) शिवडी मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सुधीर साळवी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. लालबागमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजय चौधरींना कउमेदवारी दिल्यानंतर शुक्रवारी साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवडी विधानसभेच्या जागेवरुन उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'मातोश्री' निवासस्थानी शुक्रवारी बैठक झाली. शिवडी विधानसभा मतदारसंघातून आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुधीर साळवी हे नाराज झाले होते. त्यामुळे साळवी यांना उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावले होते. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. दरम्यान, 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरेंकडून सुधीर साळवींचे मन वळवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश