मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती उद्भवल्यास अपक्ष व बंडखोर आपल्या हाताशी राहावेत यासाठी महायुती व महाआघाडी यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी खलबते सुरू आहेत. तसेच, मुख्यमंत्रीपदी नेमके कोण येणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागांची कमतरता भासली तर अपक्ष, बंडखोर आणि घटक पक्षातील निवडून येणाऱ्या आमदारांना साद घालून त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी लागणार आहेत. आपणच सत्तेवर येणार असल्याचा दावा महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमार्फत करण्यात येत आहे. त्यानंतर मविआत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उत्तम चालक असून तेही राज्याचा कारभार हाकू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यात मविआचे सरकार सत्तेत येत असून २६ तारखेला शपथविधी होणार आहे. यासाठी निवडून येणाऱ्या आमदारांची निवासाची व्यवस्था मुंबईत करण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊत हे हायकमांड आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे काय काय बोलणार, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
आमदारांची जुळवाजुळव व सुरक्षेचीही खबरदारी
राज्यातील सरकार स्थापनेसाठी एकीकडे जागांची जुळवाजुळव केली जात असतानाच दुसरीकडे दगाफटका टाळण्यासाठी आमदारांच्या सुरक्षेची विशेष खबरदारीसुद्धा घेतली जात आहे. काँग्रेसने शुक्रवारी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील सर्व विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची झूम बैठक घेतली. नंतर, पक्षाच्या कोअर ग्रुपने सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली आणि शिकार टाळण्यासाठी आमदारांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. मविआने सर्व नवनिर्वाचित आमदारांना एकाच छताखाली ठेवण्याचा आणि त्यांच्या निवासासाठी तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीकडून अपक्षांना ५० कोटींची ऑफर?
राज्यातील सत्ता जाणार या विचाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार सौदेबाजी सुरू आहे. महायुतीने अपक्ष आणि बंडखोरांना ५० कोटींची ऑफर दिली आहे, असा आरोप सेनेच्या संजय राऊत यांनी केला.
मविआ १६० जागा जिंकणार
राज्यात मविआचे सरकार सत्तेत येत असून १६० जागा मिळणार आहेत. घटक पक्ष आणि जिंकण्याची खात्री असलेले अपक्ष उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. तसेच मविआच्या निवडून येणाऱ्या आमदारांना आपल्या मतदारसंघात जाणेही महत्त्वाचे आहे. शनिवारी निकालानंतर फक्त दोन दिवसच मविआच्या हातात आहेत. त्यामुळे विजयी झालेल्या आमदारांची निवासाची व्यवस्था मुंबईत केली आहे, असे राऊत यांनी सांगितले.
राजभवनात भाजपच्या शाखा
मविआचे सरकार सत्तेत येणार याची भीती भाजप महायुतीला भेडसावत आहे. त्यामुळे मविआला सत्तेत येण्यापासून रोखणे यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राजभवनात भाजपच्या शाखा असल्याने त्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.