महाराष्ट्र

भंडारा हादरलं! ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट, छत कोसळल्याने १३-१४ कामगार अडकले, एक ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जवळपास ५ किमी दूरपर्यंत स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये, ज्या ठिकाणी आरडीएक्सची निर्मिती होते तेथे हा स्फोट झाला. कंपनीत रात्रपाळीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातलगांनी कंपनीजवळ गर्दी केली आहे.

Swapnil S

भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यात शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, स्फोटाची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या अनेक गावांना हादरा बसल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास ५ किमी दूरपर्यंत स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आला.

"ऑर्डनन्स फॅक्टरी, जवाहर नगर, भंडारा येथे झालेल्या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. छत कोसळले असून ते जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू आहे. तेथे एकूण १२ लोक असल्याची माहिती आहे, त्यापैकी २ जणांना वाचवण्यात यश आले आहे", असे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी सांगितले. तर, "भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेच्या चमूलाही पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठीसुद्धा चमू सज्ज ठेवला आहे. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयुध निर्माण कारखान्यातील आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये, ज्या ठिकाणी आरडीएक्सची निर्मिती होते तेथे हा स्फोट झाला. कंपनीत रात्रपाळीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातलगांनी कंपनीजवळ गर्दी केली आहे. या घटनेत काही कर्मचारी गंभीर स्वरुपात भाजले गेल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. (बातमी अपडेट होत आहे.)

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री