मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की अपघात, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. मंत्रालयात थेट लक्ष्मीदर्शन सुरू असून ‘एसीबी’ने धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या ‘पीए’ला अटक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला ‘इन्फ्रामॅन’ म्हणून स्वतःचे मार्केटिंग करत आहेत. पण मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला. अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधी पक्ष महाविकास आघाडीने रविवारी फडणवीस सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.
राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करताना आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयात उघडपणे सुरू असलेले ‘लक्ष्मीदर्शन’, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि घटनात्मक पदांचा होणारा अवमान या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मंत्रालयात थेट लक्ष्मीदर्शन - भास्कर जाधव
मंत्रालयात थेट लक्ष्मीदर्शन सुरू असून ‘एसीबी’ने धाड टाकून मंत्री झिरवाळ यांच्या पीएला अटक केली. मात्र, अजूनही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. राज्यात उच्चपदस्थ मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या ड्रग फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकली. पण तेथेही कारवाई झाली नाही. मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम यांच्याविरोधात पुरावे देऊनदेखील सरकार कारवाई करत नसल्याने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. राज्यात वीजदर कमी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. पण महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. ही जनतेची फसवणूक असल्याची टीकाही जाधव यांनी केली.
विधानसभा अध्यक्षांची दादागिरी सुरू - आदित्य ठाकरे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला ‘इन्फ्रामॅन’ म्हणून स्वतःचे मार्केटिंग करत आहेत. पण मुलुंडमध्ये मेट्रोमधील स्लॅब कोसळून एकाच मृत्यू झाला. एमएमआरएडीने बांधलेला पूल हा आठवे आश्चर्य मानावे लागेल. शहरात लोकांनी जगायचे कसे? रस्त्यावर चालताना मृत्यू, दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांची दादागिरी सुरू आहे. महायुतीचे बहुमताचे सरकार असूनही त्यांना विरोधी पक्षाची भीती का वाटते ? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील एक तरी जिल्हा असा दाखवा जो ‘सुजलाम सुफलाम’ आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ - वडेट्टीवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की अपघात याबाबत राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सरकारची भूमिका संदिग्ध आहे. अजितदादा यांच्या मृत्यूनंतर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. प्रमाणपत्र देण्यासाठी इतकी घाई कुणाला होती? जर ही प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली ? असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. जानेवारी महिन्यात एकट्या मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचे धोरण निश्चित नाही. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवूनही राज्य सरकारला निधी मिळालेला नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकरी सावकारांच्या पाशात अडकला आहे. चंद्रपूर येथील शेतकऱ्याला किडनी विकण्याची वेळ आली. असे विदारक चित्र सध्या महाराष्ट्रात आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदारांसाठी
काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी यावेळी शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप घेतला. या महामार्गाला शेतकऱ्यांनी स्पष्ट विरोध केला असताना जमीन मोजणीचे काम सरकारने सुरू केले आहे. परभणी इथे तर शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे हा महामार्ग कंत्राटदारासाठी शेतकऱ्यांवर थोपवला जात असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी केला. मंत्रालयात मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयात ‘एसीबी’ धाड टाकते, हे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. ‘एसीबी’ इतके स्वतंत्रपणे काम करत असेल तर आम्ही त्यांचा सत्कार करू, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीला भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, अनिल परब, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत असताना शरद पवार गटाचा एकही प्रमुख नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.