मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षा, प्रवेश प्रक्रिया याबाबत अडचणी असल्यास थेट मुंबईतील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षात (सीईटी) यावे लागते. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आता राज्यभरात ४० जिल्हास्तरीय सीईटी मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरावरच निकाली निघणार आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
प्रवेश परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सीईटी कक्षाने यापूर्वीच जिल्हास्तरीय केंद्र स्थापन केली आहेत. मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रत्येक जिल्ह्यात पूर्णवेळ सुसज्ज असे केंद्र उपलब्ध होणार आहे. या केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शन, कागदपत्रांची पडताळणी, तक्रार निवारण अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच सीईटी कक्षात कायमस्वरूपी कर्मचारी नेमले जाणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाला कायमस्वरूपी मनुष्यबळ भरतीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पदांची संख्या आणि रचना लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी राज्यभरात २० हजार संगणकांची यंत्रणा
राज्यातील परीक्षा पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सरकारने २० हजार संगणकधारित परीक्षा केंद्रांची उभारणी करण्याचेही ठरवले आहे. सध्या केवळ सात हजार संगणक उपलब्ध असल्याने सीईटी कक्षाला परीक्षा घेण्यासाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आधुनिक संगणक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून परीक्षा अधिक कार्यक्षमपणे घेता येणार आहेत.