१२ वीसाठी कॉलेज बदलण्याकडे कल; राज्यात ६१ हजार अर्ज, मुंबईत ३,८४२ विद्यार्थ्यांचे कॉलेज बदलीसाठी अर्ज 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

१२ वीसाठी कॉलेज बदलण्याकडे कल; राज्यात ६१ हजार अर्ज, मुंबईत ३,८४२ विद्यार्थ्यांचे कॉलेज बदलीसाठी अर्ज

इयत्ता ११ वी पूर्ण केल्यानंतर ज्युनिअर कॉलेज बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, यावर्षी राज्यभरातून इयत्ता १२ वीसाठी तब्बल ६१,५९२ विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलीसाठी अर्ज केले आहेत. १० वीनंतर इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी १२ वीच्या महत्त्वाच्या वर्षासाठी कॉलेज बदलण्यास उत्सुक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

प्रतिनिधी

श्रेया जाचक/मुंबई

इयत्ता ११ वी पूर्ण केल्यानंतर ज्युनिअर कॉलेज बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, यावर्षी राज्यभरातून इयत्ता १२ वीसाठी तब्बल ६१,५९२ विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलीसाठी अर्ज केले आहेत. १० वीनंतर इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी १२ वीच्या महत्त्वाच्या वर्षासाठी कॉलेज बदलण्यास उत्सुक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

लांबचा प्रवास, राहत्या ठिकाणातील बदल, पालकांची बदली, वैद्यकीय कारणे किंवा शाखा बदल ही यासाठी मुख्य कारणे ठरत आहेत. राज्यभरातून प्राप्त झालेल्या ६१,५९२ अर्जांपैकी ३०,२७४ अर्जांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आली आहे, तर १५,१८४ अर्ज अजूनही छाननी आणि मंजुरीच्या विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या वर्षापासून १२ वीच्या ज्युनिअर कॉलेज बदलीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. यापूर्वी ही कामे शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत ऑफलाईन पद्धतीने हाताळली जात होती. आता ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश पोर्टलवरच ‘ट्रान्सफर मॉडेल’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे ११ वीनंतर कॉलेज बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय एकत्रित आकडेवारी पहिल्यांदाच समोर आली आहे. मात्र, केवळ ऑनलाइन अर्ज सादर केल्याने कॉलेज बदली आपोआप होत नाही. अर्जाला मंजुरी मिळण्यासाठी अनेक टप्प्यांतून जावे लागते. यामध्ये विद्यार्थ्याचे सध्याचे ज्युनिअर कॉलेज, सध्याच्या विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालय, लागू असल्यास नवीन विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शेवटी नवीन कॉलेज यांच्या मंजुरीचा समावेश आहे.

सध्या प्रलंबित असलेल्या १५,१८४ अर्जांपैकी ५,६८२ अर्ज सध्याच्या कॉलेजांकडे, ५,२४१ अर्ज सध्याच्या शिक्षण उपसंचालकांकडे, ९६३ अर्ज नवीन शिक्षण उपसंचालकांकडे, तर ३,२९८ अर्ज विद्यार्थ्यांनी निवडलेल्या नवीन कॉलेजांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे विभागात सर्वाधिक हस्तांतरण अर्ज

पुणे विभागात कनिष्ठ महाविद्यालयातील हस्तांतरणासाठी सर्वाधिक १७,८१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागात ११,२५१, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ९,५४१ अर्ज दाखल झाले आहेत. मुंबई विभागात एकूण ३,८४२ अर्ज आले असून त्यापैकी १,६६१ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे, तर १,८१४ अर्ज प्रलंबित आहेत.

ठराविक कारणांवरच महाविद्यालय बदलण्याची परवानगी

विद्यार्थ्याला केवळ कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची इच्छा झाली किंवा पसंती बदलली म्हणून महाविद्यालय बदलता येणार नाही. शिक्षण विभागाने महाविद्यालय हस्तांतरणासाठी काही ठरावीक कारणे निश्चित केली आहेत. यामध्ये घर आणि महाविद्यालयातील जास्त अंतर, पालकाची बदली, निवासी पत्त्यात बदल, वैद्यकीय कारणे, इयत्ता अकरावीनंतर शाखा बदलणे, तसेच सीबीएसई, आयसीएसई किंवा अन्य शिक्षण मंडळातून महाराष्ट्र राज्य मंडळात प्रवेश घेणे या कारणांचा समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : 'म्हात्रेसारख्यांना मोकाट फिरण्याचा अधिकार नाही' - सर्वोच्च न्यायालय

National Film Awards 2026 : ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला

गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती

उसनवारीबाबत दोन नोटिसा; मंत्री कार्यालयांचा प्रतिसाद नाही