राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे; किडनी रुग्णांना दिलासा  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे; किडनी रुग्णांना दिलासा

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. राज्य सरकारच्या महा डायलिसिस योजनेअंतर्गत १ मे रोजी १२ नवीन डायलिसिस केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे राज्यातील एकूण डायलिसिस केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील किडनी रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या नवीन केंद्रांमुळे रुग्णांना मोफत आणि सुलभ उपचार मिळणे शक्य होणार असून खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन सोहळ्याचा भाग म्हणून या केंद्रांचे लोकार्पण केले जाणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात ९२ केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस खाटांची सोय आहे. नवीन केंद्रांच्या समावेशामुळे ही क्षमता अधिक वाढणार आहे. रुग्णांना त्यांच्या घराच्या जवळच उपचार उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचेल, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किमान पाच डायलिसिस खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मोठ्या रुग्णालयांमध्ये ही संख्या ८ ते १० दरम्यान आहे.

आगाऊ नोंदणीमुळे प्रतीक्षा कालावधी कमी होणार

कोल्हापूरमधील मुरगुड, चंद्रपूरमधील मूल, यवतमाळमधील दारव्हा, बीडमधील केज, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील रावेर, सोलापूरमधील मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला, गडचिरोलीतील कुरखेडा, रत्नागिरीतील दापोली आणि ठाण्यातील बदलापूर या ठिकाणी ही नवीन केंद्रे सुरू होत आहेत. महा डायलिसिस योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून रुग्ण वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे आगाऊ नोंदणी करू शकतात. यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होत आहे.

रक्त चाचण्या, औषधे, आहारसल्ला विनामूल्य

प्रत्येक केंद्रात तज्ज्ञ तंत्रज्ञ, परिचारिका आणि सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नेफ्रोलॉजिस्टच्या देखरेखीखाली हे कामकाज चालते. डायलिसिस सुविधेसोबतच रुग्णांना रक्ताच्या चाचण्या, आवश्यक औषधे आणि आहारविषयक सल्लाही विनामूल्य दिला जातो. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत ‘एचएलएल लाइफकेअर लिमिटेड’मार्फत ही योजना राबवण्यात येत आहे.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल