मुंबई : नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना १ मे या महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या स्थापना दिनाचा मान भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांना मिळाला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी दोघांच्या नावावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत राज्य सरकारने शासन परिपत्रक जारी केले आहे.
नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला असताना, राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्याद्वारे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त करत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरील दावा कायम आहे.
नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना १ मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे व नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांच्या नावाची अप्रत्यक्षरित्या घोषणा करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिनाचे नियोजन राज्य सरकारने जारी केले आहे. यात दादर येथील शिवाजी पार्क मैदानात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करणार आहेत. तर त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या ठिकाणी ध्वजारोहण करणार असल्याचे शासन परिपत्रकात नमूद केले आहे.