चार संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती  (Photo-X/@CMOMaharashtra)
महाराष्ट्र

चार संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती

पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि नागपूर या चारही ठिकाणी संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

Swapnil S

शिर्डी : पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि नागपूर या चारही ठिकाणी संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

शिर्डी येथे 'नाइब' ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूरमध्ये चार संरक्षण कॉरिडॉरची मागणी केली होती. मला हे सांगताना आनंद होत आहे की, संरक्षण मंत्री राजनाथजींनी माझ्या विनंतीला त्वरित मंजुरी दिली आहे. लवकरच हे सर्व संरक्षण कॉरिडॉर पूर्णपणे कार्यान्वित होतील. या प्रकल्पात ५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असून, याद्वारे ४,००० लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत." त्यांनी पुढे सांगितले की, शिर्डीतील 'नाइब' संरक्षण सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

फडणवीस म्हणाले, "येथे तयार होणारे शेल्स आणि तोफगोळे आपल्या सर्व सीमांवर जिथे गरज असेल तिथे वापरले जातील. शिर्डीतील ही सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. आम्ही सर्व तंत्रज्ञान येथे उघड करू शकत नाही, परंतु मी तुम्हाला सांगू शकतो की, भविष्यात शत्रूचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता आपल्याकडे आहेत. आम्हाला खात्री आहे की, ही सुविधा आपल्या देशाला अधिक सुरक्षित करेल आणि आपल्या निर्यात क्षमतेत मोठी भर घालेल."

'ऑपरेशन सिंधू'च्या यशाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्हाला मोठ्या प्रमाणात सी-प्लेन्सची (जलविमानांची) गरज आहे आणि हे एक अतिशय लोकप्रिय तंत्रज्ञान आहे, ज्याचे उत्पादन येथे केले जाईल. 'ऑपरेशन सिंधू' दरम्यान आपण पाहिले की, आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाने पाकिस्तानला कसे गुडघ्यावर आणले. ज्या देशांचे तंत्रज्ञान पाकिस्तान वापरत होते, त्यांची मी नावे घेत नाही, पण आपण त्यांचे प्रत्येक शस्त्र भारताच्या भूमीवर न उतरता नष्ट केले. आपल्या संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाची अचूकता आणि परफेक्शन या पातळीचे आहे." संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिर्डी येथे नाईब ग्रुपच्या संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.

सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारत येथे संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भरतेचा गड' उभारून राहिला आहे.

ते म्हणाले, "ही सुविधा पाहिल्यानंतर मी खात्रीने सांगू शकतो की, पुढील २५-३० वर्षांत भारताला जगातील सर्वात मोठा संरक्षण निर्यातदार देश बनण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आज भारताच्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात एक सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे."

Mumbai : सेवानिवृत्त अधिकारीच मागच्या दाराने सल्लागार म्हणून येतात; स्थायी समितीत गणेश खणकर यांचा आरोप

Mumbai : विजेच्या मागणीचा उच्चांक; द. मुंबईत वारंवार बत्ती गुल, गिरगाव, दादर, वडाळ्यात नागरिक हैराण

भारत सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार होईल - राजनाथ सिंह

मोदींना अमेरिकेचे निमंत्रण; मार्को रुबिओंनी घेतली पंतप्रधानांची भेट

'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक