आता वाहनचालकांची ड्रग्ज चाचणी होणार; 'स्वॅब टेस्टिंग किट्स'चा प्रस्ताव  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

आता वाहनचालकांची ड्रग्ज चाचणी होणार; 'स्वॅब टेस्टिंग किट्स'चा प्रस्ताव

महाराष्ट्रातील वाहनचालकांना मद्यधुंद वाहन चालवण्याच्या सध्याच्या 'ब्रेथलायझर' तपासणीव्यतिरिक्त लवकरच रस्तेलगत ड्रग्जच्या चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/मुंबई

महाराष्ट्रातील वाहनचालकांना मद्यधुंद वाहन चालवण्याच्या सध्याच्या 'ब्रेथलायझर' तपासणीव्यतिरिक्त लवकरच रस्तेलगत ड्रग्जच्या चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अमली किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्वॅब-आधारित किट्सच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत प्राथमिक चाचणी घेणारी रस्त्यालगतची ड्रग्ज तपासणी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभाग उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, लवकरच 'ड्रंक अँड ड्राइव्ह' पलीकडे जाऊन 'ड्रिंक ओव्हर ड्रग अँड ड्राइव्ह'च्या अंमलबजावणीकडे वाटचाल करू शकते.

ड्रग्जचे सेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकांना शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. एखादा चालक पॉझिटिव्ह आढळल्यास वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रिया त्यानंतर केल्या जातील.

स्पष्ट आकडेवारी नाही

महाराष्ट्रात ड्रग्जच्या प्रभावाखाली वाहन चालवताना पकडलेल्या चालकांची संख्या दर्शवणारा कोणताही स्वतंत्र, सर्वसमावेशक राज्यस्तरीय डेटाबेस नाही. यामुळे समस्येचे प्रमाण मोजणे आणि त्यानुसार अंमलबजावणीचे नियोजन करणे कठीण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

किट्स खरेदी केल्या

प्रस्तावित किट्स संशयित चालकाच्या लाळेचा नमुना गोळा करतील आणि काही मिनिटांतच ड्रग्ज सेवनाचा प्राथमिक अंदाज देतील. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्जच्या तपासणीसाठी अशाच प्रकारच्या स्वॅब-आधारित चाचणी किट्स खरेदी केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या यंत्रणेचा वापर भविष्यात वाहन तपासणी मोहिमेदरम्यान परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस पथकांकडून केला जाऊ शकतो. या आधी प्रस्तावात जीएसटीसह सुमारे २५.८१ कोटी रुपये खर्चाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान

पतधोरण समितीची बैठक सुरू; पाव टक्के व्याजदर वाढण्याची शक्यता

...तर पुणे शहर ठप्प होईल; आमदार रोहित पवार यांचा इशारा

पूर्णेकर हत्या प्रकरण : पप्या शिंदेला पुन्हा पाच दिवसांची कोठडी

कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय