मतवारी दुष्काळाची! डोंगर हिरवे झाले तरच दुष्काळ हटेल प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मतवारी दुष्काळाची! डोंगर हिरवे झाले तरच दुष्काळ हटेल

यंदाचा दुष्काळ एका वर्षाचा नाही, हे आधी नीट समजून घेतले पाहिजे. हा दोन वर्षांचा दुष्काळ आहे. खरीप गेला, रब्बीही हातातून गेल्यात जमा आहे आणि पुढच्या रब्बीची कोणतीही खात्री नाही. म्हणजे शेतकऱ्याला दोन खरीप आणि एक रब्बी अशा तीन हंगामांचा हिशेब मांडावा लागणार आहे...

प्रतिनिधी

पाशा पटेल

मुंबई : यंदाचा दुष्काळ एका वर्षाचा नाही, हे आधी नीट समजून घेतले पाहिजे. हा दोन वर्षांचा दुष्काळ आहे. खरीप गेला, रब्बीही हातातून गेल्यात जमा आहे आणि पुढच्या रब्बीची कोणतीही खात्री नाही. म्हणजे शेतकऱ्याला दोन खरीप आणि एक रब्बी अशा तीन हंगामांचा हिशेब मांडावा लागणार आहे. मी ज्या भागात फिरतो आहे, तिथे विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि बोअरवेलमधून फक्त हवा येत आहे. वरचे पाणी गेले हे एक वेळ समजू शकतो. पण जमिनीच्या पोटातले पाणीच आटले आहे आणि हेच खरे संकट आहे.

अशा वेळी टँकर, चारा छावण्या आणि थेट आर्थिक मदत हे सगळे तातडीने व्हायलाच हवे. पण दर काही वर्षांनी हीच वेळ का येते, याचा विचार आपण केला नाही, तर पुढच्या दुष्काळाची तयारी आपण आत्ताच करून ठेवत आहोत.

माळावरचे खड्डे आणि हजार एकर ऊस

माझ्या कलमुगुळी गावाचा अनुभव सांगतो. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत गावात प्यायलाही पाणी मिळायचे नाही. गावाला लागून शंभर एकरांचा उघडा माळ होता. त्या वेळच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी पटवून दिले आणि त्या माळावर वृक्षारोपणासाठी खड्डे खणून घेतले. हे खड्डे साधे नव्हते. पडलेल्या पावसाचा एक थेंबही बाहेर वाहून जाऊ नये, अशा आकाराचे आणि अशा पद्धतीने ते खणले. आज त्या मुरलेल्या पाण्यावर आजूबाजूला जवळपास हजार एकरांवर ऊस उभा आहे. तिथे कालवा नाही, धरण नाही आणि कुठलीही मोठी योजना नाही. फक्त माळावर अडवलेले पाणी आहे.

लोदग्यातही मी तेच केले. जेवढी पडीक रानं घेतली, त्या सगळ्यांत असेच खड्डे खणले. पावसाळा संपला की कोरडा पडणारा लोदग्याचा नाला आज या दुष्काळातही वाहतो आहे. हे मी पुस्तकात वाचून सांगत नाही, तर डोळ्यांनी पाहिलेले सांगतो आहे.

झाडाशिवाय पाऊस पडत नाही आणि झाडाशिवाय पडलेले पाणी जमिनीत मुरत नाही. दोन्हीची किल्ली झाडाकडे आहे. माणसाने मात्र राक्षसासारखी झाडे तोडली आहेत.

याच वेळी गाव तलावांतील गाळ काढण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर घ्यायला हवे. १९७२ च्या दुष्काळानंतर रोजगार हमीतून विहिरी झाल्या. पुढच्या दुष्काळांत पाझर तलाव आणि नाला बंडिंगची कामे झाली. त्यानंतर त्या तलावांकडे कुणी फिरून पाहिले नाही आणि ते गाळाने भरून गेले आहेत. तो गाळ काढला तर साठवण क्षमता वाढेल. तोच गाळ शेतात टाकला तर जमीनही कसदार होईल. ज्या भागात सरासरी तीनशे मिलिमीटर पाऊस पडतो, तिथेही अशी कामे झाली तर वर्षभराचे पाणी भागू शकते.

दुष्काळाच्या नावावर इतर कामांवर पैसा खर्च करण्यापेक्षा सरकारने याच कामात पैसा घातला पाहिजे. रस्ते आणि इतर पायाभूत कामे काही महिने थांबली तरी आभाळ कोसळणार नाही. पण डोंगर बोडके राहिले तर पुढच्या पिढीला पाणी मिळणार नाही. विकासाच्या मागे आपण जो हव्यासाने धावतो आहोत, तो थांबवावाच लागेल. या कामातून मजुरांच्या हाताला काम मिळेल आणि पुढच्या दुष्काळाची धार बोथट होईल.

एककलमी कार्यक्रम हवा

हा दुष्काळ संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहावा. पाऊस येईपर्यंतच्या महिन्यांत राज्यभर एकच काम हाती घ्यावे. डोंगर, माळरान, वनजमीन, गायरान, सरकारी पडीक जमीन आणि शेतकऱ्यांची पडीक रानं अशी जिथे जागा दिसेल, तिथे पाणी साठेल असे खड्डे खणावेत. पाऊस पडल्यावर त्याच खड्ड्यांत झाडे लावावीत. खड्डा खणला की झाड जगते आणि पाणी मुरते. ते पाणी इतके मुरते की पुढे दोन-तीन वर्षे पाऊस कमी पडला तरी त्या भागाला टंचाई जाणवत नाही.

नद्यांचे उगम आटल्याने फटका

बीड जिल्ह्यातला पाटोदा तालुका पाहिला की हा प्रश्न अधिक स्पष्ट होतो. मराठवाड्यात गोदावरीनंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी मांजरा आहे आणि तिचा उगम पाटोद्याच्या डोंगरांत आहे. आणखी काही नद्या याच भागातून निघतात. एकेकाळी या टेकड्यांवर दाट झाडी असणार. पाऊस पडला की ते पाणी मुळांच्या आधाराने जमिनीत मुरायचे आणि वर्षभर हळूहळू पाझरत राहायचे. म्हणून या नद्या बारमाही वाहत होत्या. आज तेच डोंगर बोडके आहेत. पाऊस पडतो आणि पाणी माती घेऊन वाहून जाते. त्यामुळे नदी डिसेंबरपर्यंतही टिकत नाही.

(क्रमशः)

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोग

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व CET वर्षातून दोनदा; १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

ठाण्यात मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणार; गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो धावणार

आता १०० टक्के शुद्ध इथेनॉल; सरकारने E100 इंधनाला दिली मंजुरी

राज्य सरकार इस्टेट एजंट झाले आहे का? कांदळवन बचाओ मोहीम राबवणार; जितेंद्र आव्हाड यांची टीका