मुंबई: शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित करत असून यंदा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा होणार असून, ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. या मेळाव्यांत दोन्ही नेते एकमेकांना कोणत्या मुद्द्यावर लक्ष्य करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दोन्ही नेते विधानसभेचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा टिझर शुक्रवारी लाँच करण्यात आला. 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार होता भगवा रंग, पण कोणाशी तरी आघाडी करत विकला तो भगवा रंग', असा जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी हातात धनुष्यबाण घेत व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर साधला आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर टिझर लाँच केला होता, तर शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेने आपला टिझर लाँच केला आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दरवर्षी हमरीतुमरी सुरू असते. मात्र, यंदा असा प्रकार दिसून आला नाही. यंदा शिंदेंच्या शिवसेनेचा आझाद मैदानात दसरा मेळावा होणार आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर यावेळचा दसरा मेळावा होत असल्याने दोन्ही गट निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबईत ऐन सणासुदीच्या दिवशी पोलिसांवरील ताण वाढला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही मेळाव्यांच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
शिवाजी पार्क आणि बाळासाहेबांचे अतूट नाते आहे. गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होत आहे, शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा होणार असून उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असेल ? ते कोणावर बरसणार? याकडे राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे कुणावर बरसणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आझाद मैदानातच दसरा मेळावा होत आहे. मूळ शिवसेनेवर कब्जा मिळाल्यापासून शिंदे यांच्या राजकीय ताकदीत वाढ झाल्याचे दिसत आहे. ते दरवर्षीप्रमाणे ठाकरे कुटुंबावरच यंदा हल्लाबोल करणार की विकासाच्या मुद्द्यावर भर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.