महाराष्ट्र

भाजपचे सर्वाधिक उमेदवार; जागावाटपात ठरला किंग

Maharashtra Elections 2024 : जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकमत नसल्याने कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे गुलदस्त्यातच होते. अखेर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणाचे किती शिलेदार रिंगणात आहेत, हे समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकमत नसल्याने कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे गुलदस्त्यातच होते. अखेर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणाचे किती शिलेदार रिंगणात आहेत, हे समोर आले आहे. राज्यात दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपात भाजपच 'दादा' ठरला असून त्यांचे सर्वाधिक १४८ उमेदवार रिंगणात आहेत.

लोकसभेला चांगले यश मिळालेल्या शिवसेना शिंदे गटाने ८० जागांपर्यंत मजल मारली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ५३ जागांवर बोळवण करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये ९० चा फॉर्म्युला ठरवण्यात आला असला तरी सरतेशेवटी काँग्रेसने १०२ जागांवर उमेदवार उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाने ८९ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने ८७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महायुतीने यंदा घटक पक्षांसाठी ५ जागा सोडल्या असून महाविकास आघाडीकडून अन्य पक्ष ६ जागांवर निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या २ तर महाविकास आघाडीच्या ३ जागांवर अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही.

राज्याच्या राजकारणात यंदा प्रथमच मोठ्या उलाढाली घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यामुळे त्यांचे प्रत्येकी दोन पक्ष आमनेसामने लढणार आहेत. त्यामुळेच राज्यात यंदा ६ प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना आपले नशीब अजमावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे बंडखोरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. यंदाच्या निवडणुकीत २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात आहेत. - त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत कोण माघार घेते, यावरून विधानसभा निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (मूळ) एकत्र लढली होती. त्यात भाजपने १६४ जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेना मात्र १२४ जागांवर लढली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही शेवटच्या क्षणी युती झाली होती, त्यावेळी काँग्रेस १४७ जागांवर तर राष्ट्रवादी (मूळ) १२४ जागांवर लढली होती.

- महायुतीत भाजप १४८, शिंदे गट ८०, अजितदादा गट ५३ जागा

- मविआत काँग्रेस १०२, ठाकरे गट ८९, तर शरद पवार गट ८७ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी