महाराष्ट्र सरकारने अखेर मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठं नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, एकूण ३१,६२८ कोटी रुपयांचं भरपाई पॅकेज जाहीर करण्यात आलं असून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला प्रति हेक्टर ४८,००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.
फडणवीस यांनी सांगितलं की, “या संकटाच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे. हे पॅकेज राज्यातील आतापर्यंतचं सर्वात व्यापक सहाय्य आहे.”
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे तब्बल २९ जिल्ह्यांतील २५३ तालुके प्रभावित झाले असून सुमारे ६८ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यापैकी मातीचा थर वाहून गेल्याने ६०,००० हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांना थेट खात्यात भरपाई
ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून, पीक विमा लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रति हेक्टर १७,००० रुपये मिळतील. सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत ४७,००० रुपये रोख तसेच पूरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतची मदत देणार आहे.
घर, जनावरं, दुकाने यांनाही मदत
पूरामुळे घरं आणि उपजीविकेचं नुकसान झालेल्यांसाठी देखील सरकारनं वेगवेगळ्या प्रकारच्या भरपाईची तरतूद केली आहे -
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत
जखमी व्यक्तींना ७४,००० रुपये ते अडीज लाख रुपये
घरगुती वस्तु आणि भांड्यांचे नुकसान ५००० प्रतिकुटुंब
कपडे, वस्तूंचे नुकसान ५००० प्रतिकुटुंब
दुकानदार, टपरीधारक ५०,००० रुपये
डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना १,२०,००० रुपये
डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना १,३०,००० रुपये
झोपड्या ८००० रुपये
आंशिक नुकसान झालेल्या घरांसाठी ६,५०० रुपयांपर्यंत मदत
दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७,५०० रुपयांची मदत
ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२,००० रुपये
छोट्या दुकानदारांना ५०,००० रुपयांपर्यंत सहाय्य
खरडून गेलेल्या जमिनीसाठी ४७,००० प्रतिहेक्टर रोखीने आणि
मनरेगाअंतर्गत ३ लाख प्रतिहेक्टर मदत
खचलेली किंवा बाधित विहीर: ३०,०००
तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी DPDC मध्ये राखीव
शेतकऱ्यांना ४८,००० प्रतिहेक्टरी मिळणार मदत
पीकविमा अंदाजे ५००० कोटी
तसेच नुकसान भरपाईसकट केंद्रसरकारने पुढील मदत जाहीर केली आहे.
दुष्काळी सवलती लागू
जमीन महसुलात सुट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेती कर्ज वसुलीला स्थगिती
वीज बिल माफी आधीच
शाळा, कॉलेज परीक्षा शुल्कात माफी
रोहयो कामात शिथिलता
शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
कर्जमाफीची घोषणा ‘योग्य वेळी’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, "सरकार योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा करेल. परंतु सध्याची प्राथमिकता शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे आहे."
मदत पॅकेज पोकळ
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या भरपाई पॅकेजला 'पोकळ' आणि 'फसवणुकीचा आराखडा' असं म्हटलं आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखी आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.