मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, कापसाला चांगला भाव मिळालेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू, अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करते पण शेतकरी कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही. म्हणून लातूरमधील ६५ वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपले. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
विरोधकांचा बहिष्कार
वडेट्टीवार यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले, शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत आहेत, असा आरोप करीत सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये
शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत विरोधकांना सभागृहात गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.