दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद  
महाराष्ट्र

दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, संशयित भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी धडक मोहीम राबवून १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत आणि ४ आस्थापनांचे कामकाज बंद केले आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, संशयित भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी धडक मोहीम राबवून १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत आणि ४ आस्थापनांचे कामकाज बंद पाडले आहे.

परवाने निलंबित केलेल्यांमध्ये मुंबईतील पाच, पुण्यातील सहा, छत्रपती संभाजीनगरमधील पाच आणि अमरावती विभागातील दोन आस्थापनांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांच्या तयारी आणि साठवणुकीत गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्याचे विभागाने म्हटले आहे.

यासोबत एफडीएने पुणे येथील तीन आणि अमरावती येथील एका आस्थापनेसह एकूण चार अन्न आस्थापनांचे कामकाज बंद केले आहे. ३६ अन्न आस्थापनांच्या तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांनी सुमारे १४,३४० किलो खाद्यपदार्थ आणि २०४ लिटर कोकम जप्त केले, ज्याची एकूण किंमत ३७.४९ लाख रुपये आहे.

मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, फराळ, मसाले, खाद्यतेल आणि सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) तयार करणारे उत्पादक, साठा करणारे व्यावसायिक आणि विक्रेत्यांना लक्ष्य करत ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सातही विभागांमध्ये ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.

दोन गुन्हे, तिघांना अटक

याशिवाय, प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील एका कारवाईत, एफडीएने दोन ठिकाणांहून १६.८६ लाख रुपये मूल्याचा गुटखा, पान मसाला, सुवासिक तंबाकू आणि तत्सम पदार्थ जप्त केले. या जप्तीच्या संबंधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

एफडीएचे आवाहन

एफडीएने नागरिकांना केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करण्याचे आणि लेबल, बॅच नंबर, पॅकिंगची तारीख तसेच बेस्ट-बिफोर (वापरण्याची अंतिम तारीख) तपशील तपासण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक कोणत्याही संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांबद्दल १८००-२२२-३६५ या टोल-फ्री हेल्पलाइनवर किंवा विभागाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा; राम मॅन्शनच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

दिवाळीत गावी जाणं महागलं! खासगी बसच्या तिकीट दरांत थेट दुप्पट-तिप्पट वाढ, प्रवासी संतापले