नांदेड : संसदेत रविवारी सादर केलेला अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एक लाख कोटी रुपये मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाची रूपरेषा तयार करून राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडणार आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील प्रचंड विकास कामे मार्गी लागणार आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले असता सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला आमदार राजेश पवार, भाजपचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर आदींची उपस्थिती होती.
ते म्हणाले की, केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा ९८,३०६ कोटी रुपये असेल. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, १२,३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे एक लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील. देशात पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ एक लाख कोटी असायची. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी दिला जाईल.शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच पीएम सूर्यघर मोफत योजनेवर विशेष भर देण्यात आला असून एक कोटी घरांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. याचबरोबर या अर्थसंकल्पातून आरोग्याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
‘ बायोफार्मा मिशन’ केवळ औषधांच्या किमती नियंत्रित करणार नाही तर भारताला जागतिक औषध निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवेल.
महाराष्ट्रासाठी काय?
पुणे-मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉर घोषणा करण्यात आली आहे. यामुळे १७० कि.मी.चा हा प्रवास केवळ ४८ मिनिटात पूर्ण होणार आहे. तसेच पुणे- हैदराबाद हायस्पीट हायस्पीड कॉरिडॉरमुळे ५५० कि.मी.चा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : ३७८.३८ कोटी रुपये,महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस प्रकल्प : १६७.२८ कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर: २८३.७७ कोटी,महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : ३८५.७८ कोटी उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : २०७.१० कोटी शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : ६४६.२४ कोटी,
मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प: ३१३.६५ कोटी, जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : २४०.९० कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : ६१०३ कोटी,मुंबई मेट्रो : १७०२ कोटी, एमयुटीपी ३ : ४६२ कोटी. एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : १५५.३२ कोटी,समृद्धी महामार्गावर आयटीएस : ६८०.७९ कोटी, आणि पुणे मेट्रोसाठी ५१७.७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महसूल आयुक्तालय लवकरच
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील प्रशासकीय कामकाज एका आयुक्तांना करणे खरोखरच कठीण आहे. यामुळे नांदेड येथील महसूल आयुक्तालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.
महापौर निवडीचा निर्णय राज्य कोअर कमिटीकडून
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असल्याने येत्या १० फेब्रुवारी रोजी नवीन महापौर कोण होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता भाजपच्या राज्य कोअर कमिटीकडून नवीन महापौर निवडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.