पुणे : राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, पारा चाळीशीपार पोहचला आहे. कोकण,विदर्भातील काही भागात बुधवारी उष्णतेची लाट कायम राहणार आहे, दरम्यान अकोल्यात सलग तापमानाचा पारा वाढत असून, मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
विदर्भ, तसेच कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मंगळवारी मुंबई, ठाणे,पालघर मध्ये , तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट होती. पारा वाढल्याने घामाच्या धारा लागल्या असून, शीत पेयांच्या मागणीत वाढ झाली आहे.सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारी रस्ते ओस पडत आहेत. हवामान विभागाने सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.
कोकण, विदर्भात आज उष्णतेची लाट
दरम्यान, कोकण तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात बुधवारी उष्णतेची लाट राहणार आहे. त्यानंतर मात्र लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.यात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, जालना मध्ये बुधवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज
राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.यात शुक्रवारी दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा, तर शनिवारी कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.यात विदर्भात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा येलो अलर्ट आहे.