लातूरमध्ये उष्माघाताचा चौथा बळी; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 
महाराष्ट्र

लातूरमध्ये उष्माघाताचा चौथा बळी; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra Heatwave : राज्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, विदर्भ आणि मराठवाडा अक्षरशः होरपळून निघत आहे.

Swapnil S

लातूर : राज्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, विदर्भ आणि मराठवाडा अक्षरशः होरपळून निघत आहे. लातूर जिल्ह्यात उष्माघाताने मृत्यू होण्याचे सत्र सुरूच असून, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे मंगळवारी एका ७५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यातील उष्माघाताच्या बळींची संख्या आता चारवर पोहोचली असून नागरिक भयभीत झाले आहेत.

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, त्र्यंबक नारायण बेळंबे (७५) हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जनावरांसाठी चारा कापण्याचे काम करत होते. प्रखर उन्हामुळे काम करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

लातूर जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढला

गेल्या काही दिवसांत लातूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे मृत्यू होण्याच्या चार घटना घडल्या आहेत. एरंडी येथील २५ वर्षीय शेतकरी महेश लिंबाजी इंगोले हे शेतातील काम करून घरी परतल्यानंतर चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला.

गोंद्री येथील एका ९ महिन्यांच्या बाळाचा तीव्र उन्हामुळे प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा संशय आहे. औराद शहाजनी येथे एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा प्रखर उन्हाचा फटका बसून मृत्यू झाला. तर आज पानचिंचोली येथे ७५ वर्षीय त्र्यंबक नारायण बेळंबे यांचा शेतात चारा कापताना उष्माघाताने मृत्यू झाला.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग