ऑल द बेस्ट! बारावीची परीक्षा आजपासून सुरू; गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके तैनात प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

ऑल द बेस्ट! बारावीची परीक्षा आजपासून सुरू; गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके तैनात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील ९ विभागांमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. ही परीक्षा १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील ९ विभागांमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून (१० फेब्रुवारी) सुरू होत आहे. ही परीक्षा १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. यावर्षी परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यामध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली आणि १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण १० हजार ६६४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संपूर्ण राज्यात ३ हजार ३८७ मुख्य परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शाखांनिहाय विचार केल्यास विज्ञान शाखेतून सर्वाधिक ७ लाख ९९ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल कला शाखेचे ३ लाख ८० हजार ६९२, वाणिज्य शाखेचे ३ लाख २० हजार १५२, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २७ हजार ३७८ आणि तांत्रिक विज्ञान (आयटीआय) शाखेचे ४ हजार ४९२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. याव्यतिरिक्त 'माहिती तंत्रज्ञान' आणि 'सामान्य ज्ञान' या विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून, यासाठी अनुक्रमे २ लाख ३६ हजार ३२० आणि १ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी विशेष सवलती आणि सोयी

विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने वेळापत्रकात महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये पुरेसा खंड ठेवला आहे. तसेच, मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी निर्धारित वेळेनंतर १० मिनिटांची वाढीव वेळ देण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार विशेष सवलती लागू राहतील. जर काही विद्यार्थी वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक, तोंडी वा अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी १२ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत 'आउट ऑफ टर्न' परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कडक बंदोबस्त आणि 'कॉपीमुक्त' अभियान

परीक्षा पारदर्शक आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य शासनाने 'कॉपीमुक्त अभियान' हाती घेतले आहे. यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके तैनात करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या कार्यरत राहतील. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध आहेत, तिथे परीक्षा कॅमेराबद्ध केली जाईल. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी 'महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रकार कायदा १९८२' नुसार कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असून, दोषींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

समुपदेशन आणि हेल्पलाईन सुविधा

परीक्षेच्या भीतीपोटी किंवा मानसिक दबावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य मंडळाने १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय जिल्हास्तरावरही प्रत्येकी दोन समुपदेशक उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत वेळापत्रकाचेच पालन करावे, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एसटी बसची नियमित सोय आणि अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल