

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच मुंबईतून दुर्दैवी घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी येथे दहीहंडी उत्सवादरम्यान विटांचा खांब कोसळून ७ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. रुद्र कदम असे मृत मुलाचे नाव असून, शनिवारी (दि.५) दुपारी ही घटना घडली.
चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
माहितीनुसार, मालाड पश्चिमेतील मालवणी येथील चिकूवाडी परिसरात शनिवारी दहीहंडी उत्सवादरम्यान ही घटना घडली. मुले स्वतःच दहीहंडी साजरी करत होती. एका झाडाला आणि तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या खांबाला दोरी बांधण्यात आली होती.
दुपारी सुमारे ३.०१ वाजता एकता वेल्फेअर सोसायटी परिसरात हंडी फोडत असताना विटांचा खांब मुलाच्या अंगावर कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विटांचा खांब नेमका कशामुळे कोसळला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पुण्यात महिलेचा मृत्यू
पुण्यातील जुनी सांगवी परिसरातही दहीहंडी उत्सवादरम्यान शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. गल्ली क्रमांक २ येथे विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या लोखंडी संरचनेचा भाग अंगावर पडल्याने सलमा सलाउद्दीन पठाण (४५) यांचा मृत्यू झाला.
सलमा या पती सलाउद्दीन यांच्यासोबत दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांचा मुलगा मंडळाशी संबंधित गोविंदा असून, तो मानवी मनोऱ्यात सहभागी झाला होता.
संरचना उतरवताना दुर्घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर शुक्रवारी रात्री तात्पुरती उभारलेली लोखंडी संरचना उतरवण्याचे काम सुरू होते. याचवेळी संरचनेचा एक अवजड भाग अचानक खाली पडून सलमा पठाण यांच्या डोक्यावर आदळला. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पठाण यांच्या कुटुंबीयांनी आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, लोखंडी संरचना नेमकी कशामुळे कोसळली, याचा तपास सुरू आहे.
मुंबईत २२ गोविंदा जखमी
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ५) दुपारपर्यंत मुंबई आणि उपनगरांत दहीहंडी उत्सवादरम्यान २२ गोविंदा जखमी झाले. शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या २० जखमींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पूर्व उपनगरातील आणखी एका जखमी गोविंदालाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, पश्चिम उपनगरातील एक गोविंदा सध्या उपचाराधीन आहे.
जखमी गोविंदांसाठी १०० हून अधिक बेड सज्ज
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जखमी गोविंदांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था केली आहे. पालिकेची १६ उपनगरीय रुग्णालये तसेच सायनमधील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय, परळमधील केईएम रुग्णालय आणि मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात मिळून १०० हून अधिक बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला असून, गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
या दुर्घटनांमुळे दहीहंडी उत्सवादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दहीहंडीची उभारणी तसेच कार्यक्रमानंतर तात्पुरत्या संरचना हटवताना अधिक खबरदारी घेण्याची गरज या घटनांतून अधोरेखित झाली आहे.