उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच आघाडीवर; ३६ हजार कंपन्या बंद झाल्याच्या माहितीचा विपर्यास : मुख्यमंत्र्यांचा दावा संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच आघाडीवर; ३६ हजार कंपन्या बंद झाल्याच्या माहितीचा विपर्यास : मुख्यमंत्र्यांचा दावा

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केंद्र सरकारकडून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला. प्रत्यक्षात यातील ७६ टक्के कंपन्या डिफंक्ट होत्या. ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.

Swapnil S

मुंबई : लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केंद्र सरकारकडून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला. प्रत्यक्षात यातील ७६ टक्के कंपन्या डिफंक्ट होत्या. ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र उद्योगात क्रमांक एकवर होता आणि कायम क्रमांक १वरच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्याची माहिती देण्यात आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी एक्स या समाजमाध्यमातून सरकारवर निशाणा साधताना राज्यातील उद्योग बंद पडणे किंवा स्थलांतरित होणे भूषणावह नाही, अशी टीका केली होती. या टीकेला फडणवीस यांनी समाजमाध्यमातूनच उत्तर दिले.

ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील ७६ टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता 'संसदेत विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर' किंवा 'माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर' याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली तर इतर तपशील मिळू शकतो. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. देशात एकूण ३१ लाखांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे २१ लाख कंपन्या आज सक्रिय आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे ३ लाख ९६ हजार २११ कंपन्या महाराष्ट्रात असून त्या सुरू आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

चाकणच्या औद्योगिक क्षेत्रात काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने १२ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालीन आराखडा निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

चाकणची स्थिती गंभीर

पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांशी संबंधित गंभीर समस्या असल्याची कबुली फडणवीस यांनी यावेळी दिली. पाच-सात वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असल्याने या समस्यांच्या निराकरणाची जबाबदारी नेमकी कोणाची, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार करून त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चाकणमधील प्रश्नांबाबत लक्ष वेधले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर आजपासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल धावणार; अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीतील प्रवाशांना दिलासा

Mumbai : 'मुलुंड डम्पिंग'ची जागा अदानींशी संबंधित कंपनीला; १५ एकर जमीन पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

धारावीत सापडेल स्वातंत्र्याचा नवा अर्थ

धारावीचा पुनर्विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना द्या खास मराठी देशभक्तीपर संदेश; सोशल मीडियावर शेअर करा आकर्षक HD कार्ड्स