नवी मुंबई : सिडको आणि राज्य शासनाला हाताशी धरून यशवंत बिवलकर आणि मंत्री संजय सिरसाट यांनी ५० हजार करोड रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना जमीन मालक यशवंत बिवलकर यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक ज्याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत अशा उर्मेश उदानी या वादग्रस्त बिल्डरला ही जमीन मिळावी यासाठी रोहित पवार प्रयत्न करीत आहेत, असा आरोप बिवलकर यांनी केला.
पत्रकार परिषदेत उर्मेश उदानी यांचे शरद पवार यांच्याबरोबर असलेले फोटो बिवलकर यांनी दाखिवले. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक मगर यांना ती जमीन द्या, असेही निरोप येत असल्याचा दावा बिवलकर यांच्या वकिलांनी केला.
कमलेश उर्फ के. कुमार हा उदाणीचा साथीदार असून या के. कुमारच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सिडकोविरोधात मोर्चा काढला होता, असा आरोप त्यांनी केला.
सिडकोची जमीन भुमिपुत्रांना द्यावी- रोहित पवार
सिडकोच्या हक्काची जमीन कंत्राटदार विकासक यांना न देता भूमिपुत्रांना द्यावी. बिवलकर यांना मी पाहिलेही नाही. मंत्री सिरसाट यांनी ५ हजार कोटीचा मलिदा खाल्ला आहे. सरकारची जमीन सरकारला मिळावी, अशी आमची मागणी आहे. हे प्रकरण सर्व उजेडात येण्यासाठी मागणीनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी दिली आहे.