महाराष्ट्र

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

चालू (२०२५-२६) गाळप हंगामात महाराष्ट्राने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मोठ्या फरकाने मागे टाकत देशात प्रथम क्रमांक पटकावण्याकडे कूच केली आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) पुण्यात झालेल्या बैठकीत जाहीर ताजी आकडेवारी जाहीर केली.

Swapnil S

पुणे : चालू (२०२५-२६) गाळप हंगामात महाराष्ट्राने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मोठ्या फरकाने मागे टाकत देशात प्रथम क्रमांक पटकावण्याकडे कूच केली आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) पुण्यात झालेल्या बैठकीत जाहीर ताजी आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, या हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन ३२४ लाख टन राहण्याची शक्यता असून, त्यात महाराष्ट्राचा वाटा ११८ लाख टन इतका असेल. गेल्या हंगामात महाराष्ट्राचे उत्पादन ९३.५१ लाख टन होते, म्हणजेच यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे. याउलट, उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन ९८.५ लाख टन राहण्याचा अंदाज असून गेल्या वर्षीच्या १०१.१६ लाख टनांच्या तुलनेत त्यात घट झाली आहे.

‘इस्मा'च्या कार्यकारी समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीनंतर देशातील साखर उत्पादनाचा चालू हंगामातील तिसरा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे मूल्यमापन करून हा अंदाज मांडण्यात आला आहे. त्यात आतापर्यंत तोडणी झालेल्या उसाचे क्षेत्र, तोडणी राहिलेले क्षेत्र यांचा विचार करण्यात आला आहे तसेच उसाचे उत्पादन, साखरेचा उतारा या गोष्टींचाही विचार यात करण्यात आला आहे. इस्माच्या अंदाजानुसार, देशात या हंगामात साखर उत्पादन ३२४ लाख टन राहील. त्यातील ३१ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात येईल. यामुळे निव्वळ साखर उत्पादन २९३ लाख टन असेल. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन १२ टक्के जास्त असेल. आधीच्या अंदाजात देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर राहील, असे चित्र मांडण्यात आले होते.

राज्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल

विभागीय कामगिरीचा आढावा घेतल्यास, कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्याच्या बाबतीत राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. कोल्हापूर विभागातील ३९ कारखान्यांनी २३३.८५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून सर्वाधिक १०.९७ टक्के साखर उतारा मिळवला आहे. या विभागात आतापर्यंत २६ साखर कारखान्यांनी त्यांचे गाळप हंगाम पूर्ण करून कामकाज बंद केले आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक ४९ साखर कारखाने सुरू झाले होते, जिथे २२२.२० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून येथील साखर उतारा ८.५५ टक्के आहे. पुणे विभागात ३२ कारखान्यांच्या माध्यमातून २१६.०३ लाख मेट्रिक टन ऊसावर प्रक्रिया करण्यात आली असून येथील साखर उतारा ९.७५ टक्के नोंदवला गेला आहे.

उत्तर प्रदेशला टाकले मागे

नवीन अंदाजात उत्तर प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्र प्रथम स्थानी पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादन ११८ लाख टन असेल. गेल्या हंगामात ते ९३.५१ लाख टन होते. उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन ९८.५ लाख टन अपेक्षित असून, ते गेल्या हंगामात १०१.१६ लाख टन होते. कर्नाटकचे उत्पादन ६१.०४ लाख टन राहण्याचा अंदाज असून ते गेल्या हंगामात ५४.८८ लाख टन होते.

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

राज्यभरातील IVF, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होणार; बदलापूर येथे रूपाली चाकणकर यांची माहिती

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

NZ vs ENG, ICC T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या मार्गात आज इंग्लंडचा अडथळा