ANI आणि PTI च्या व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
महाराष्ट्र

आज मतदानाचा वार! निवडणूक प्रशासनासह पोलीस सज्ज; नगरपालिका व नगरपंचायतींचे ठरणार भवितव्य

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज (२ डिसेंबर) नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका पार पडत आहेत. पालघर, बदलापूर, नांदेड, सातारा, कोल्हापूर, जळगाव आणि सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने मतदान सुरक्षित व पारदर्शक पार पडावे, यासाठी सर्व यंत्रणा तैनात केल्या आहेत. या निवडणुकीत मतदार आपल्या मताचा अधिकार बजावून स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेतृत्व ठरवणार आहेत.

Krantee V. Kale

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज (२ डिसेंबर) नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका पार पडत आहेत. पालघर, बदलापूर, नांदेड, सातारा, कोल्हापूर, जळगाव आणि सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने मतदान सुरक्षित व पारदर्शक पार पडावे, यासाठी सर्व यंत्रणा तैनात केल्या आहेत. या निवडणुकीत मतदार आपल्या मताचा अधिकार बजावून स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेतृत्व ठरवणार आहेत.

पुण्यात १२ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतींसाठी आज निवडणूक; चुरशीच्या लढती आणि महायुतीत प्रमुख स्पर्धा

पुणे : पुणे जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. मात्र, बारामती आणि फुरसुंगी नगरपरिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. इंदापूर, चाकण, लोणावळ्यासह अनेक भागांत चुरशीच्या लढती रंगलेल्या आहेत.

मतदानाच्या टक्केवारीबाबतही उच्च उत्सुकता आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना आणि राजकीय पक्षांना शांततेत मतदान करून आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन केले आहे.

मतदार, उमेदवार आणि मतदान केंद्र

अध्यक्षपदासाठी उमेदवार - ७६

सदस्यपदासाठी उमेदवार - ९५५

मतदानाची वेळ - सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

मतदान केंद्रे - ५२४

मतदार - ४,५१,२५ (पुरुष: २,२७,१४२; महिला: २,२३,४०७; इतर: २३)

इंदापूरमध्ये चुरशीची लढत

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या भरत शहा व प्रदीप गारटकर यांच्यात नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इतर अनेक नेत्यांनी गारटकर यांना पाठिंबा दिला आहे. चाकणमध्ये शिंदे गटासाठी नगराध्यक्षपद ठरवण्यासाठी ठाकरेसेनेने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे येथील लढतही रंगतदार आहे.

लोणावळ्यात महायुतीत प्रमुख स्पर्धा

लोणावळ्यात आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा स्पर्धेत तपासली जात आहे. जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे गट किंवा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महत्त्वाच्या लढती होत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीत महाविकास आघाडी काहीशी मागे पडलेली दिसते. आजच्या मतदानादरम्यान पुणे जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि निवडणूक अधिकारी संपूर्ण सज्ज असून, मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडावे, असा प्रमुख उद्देश आहे.

सिंधुदुर्गात ५० हजार मतदार ठरवणार नगरपालिकांचे भवितव्य

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान आज होत असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली

आहे. मतदान शांततेत पार पडावे, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस प्रमुख मोहन दहीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार लढाई सुरु असून उद्या होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.महायुतीतील भाजप आणि शिंदे सेना हे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असून गेले १० दिवस जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असून या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मालवण, वेंगुर्ले सावंतवाडी या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत अशा चार शहरांमध्ये या निवडणुका होत आहेत.चारही ठिकाणी महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असून त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. गेल्या दहा दिवसात मालवण आणि कणकवली या शहरांमध्ये राजकीय वातावरण अनेक कारणांनी बरेच तापले असून हे दोन्ही ही दोन्ही शहरे हॉटस्पॉट बनली आहेत.

४ नगरपालिकांमध्ये आज मतदान

सावंतवाडी • वेंगुर्ले •मालवण• कणकवली

एकूण मतदान केंद्रे: ७४

एकूण मतदार: सुमारे ५०,०००

केंद्रांवर कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था,

उमेदवारांची संख्या

नगराध्यक्षपदासाठी उमेदवार : १८

सावंतवाडी - ६

वेंगुर्ले - ६

मालवण - बहुकोनी लढत

कणकवली -बहुकोनी लढत

नगरसेवक पदासाठी एकूण उमेदवार : २७९

जळगावमध्ये ४६४ जागांसाठी १५५ उमेदवार

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपालिका आणि २ नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री १० वाजता अधिकृतपणे संपला असून आज (मंगळवार) मतदार आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. या निवडणुकांमध्ये ४६४ जागांसाठी १५५ उमेदवार रिंगणात आहेत.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपचे स्पष्ट वर्चस्व राहिले असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटितपणे निवडणूक लढवत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गट सक्रिय असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठिंब्याने त्यांनी आपली ताकद दाखवली आहे. काँग्रेसचा प्रचार अत्यंत निष्क्रिय, जिल्ह्यात कोणीही प्रमुख नेते फिरकले नाहीत. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) वरच्या पातळीवरून फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे जाणवले.

राजकीय महत्त्वाची लढत

शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्ह्यातील आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आक्रमक भूमिकेत.

प्रचाराचा अखेरचा दिवस गाजला

सोमवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी:

१८ नगरपालिकांमध्ये प्रचार फेऱ्यांचा जोरदार उत्साह

उमेदवारांकडून कॉर्नर सभा, पदयात्रा, शक्तिप्रदर्शन

रात्री १० वाजता आदर्श आचारसंहितेनुसार सर्व प्रचारकार्य बंद

साताऱ्यात ७ नगरपरिषदा व १ नगरपंचायतीसाठी आज मतदान

कराड : राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या सात नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत अशा एकूण ८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे मतदान आज (मंगळवार, २ डिसेंबर) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत पार पडणार आहे. तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी दुपारी नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेतील विविध मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान किटचे (साहित्य) वाटप करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अधिकारी-कर्मचारी आपल्या-आपल्या नियुक्त मतदान केंद्रांकडे रवाना झाले. ‘आम्ही जातो आमुच्या मतदान केंद्रा, आमुचा रामराम घ्यावा’ असे त्यांनी म्हटले नसेल तरच नवल! सातारा जिल्ह्यातील या ८ नागरी संस्थांसाठी एकूण ३७४ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या केंद्रांवर केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, शिपाई, पोलीस कर्मचारी अशा मिळून २,३५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ५४ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत.

विशेष मतदान केंद्र

सातारा नगरपरिषद : महिलांसाठी व दिव्यांगांसाठी प्रत्येकी एक विशेष मतदान केंद्र, बांबू संकल्पनेवर २ आणि भारतीय सैन्य दल संकल्पनेवर १ मतदान केंद्र.

वाई नगरपरिषद : महिलांसाठी व दिव्यांगांसाठी एक विशेष केंद्र.

म्हसवड नगरपरिषद : महिलांसाठी एक विशेष केंद्र.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे नियमभंग होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष राहणार आहे. तसेच सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा.

- संतोष पाटील, जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू

कोल्हापूर : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात १६३ लागू केले असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या मतदारसंघात ३ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करता यावे म्हणून राज्य शासनाने २ डिसेंबर रोजी सर्व कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. जर सुट्टी न दिल्यास इचलकरंजी उपविभागातील कामगारांनी तक्रार येथे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, इचलकरंजी गेट नं. २, राजाराम स्टेडियम, बस स्थानकासमोर उद्योग व कामगार विभागाने सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालघरमध्ये पोलीस दल सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, डहाणू नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायत या चार ठिकाणांसाठी आज (२ डिसेंबर) मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन आणि पोलिस दल यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान पेट्या व व्हिव्हीपॅडचे वाटप करण्यात आले असून सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २ डिसेंबरच्या मतदानासाठी पालघर पोलीस दलाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्यासाठीही स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषदा आणि वाडा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ४ नगराध्यक्षपदांसाठी १७ उमेदवार रिंगणात ९४ नगरसेवकपदांसाठी ३१६ उमेदवार असून एकूण मतदार : १,१६,६६० मतदान केंद्रे : पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, ८ पोलीस निरीक्षक, ३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ४२४ पोलीस अंमलदार, २३० होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या ३ तुकड्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या, ३ राखीव स्ट्रायकिंग फोर्स पथके आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित आहेत.

निवडणुकीदरम्यान शस्त्रांचा गैरवापर किंवा सुरक्षेला बाधा येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३१५ परवानाधारक अग्नशस्त्रांपैकी ३११ शस्त्रे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जमा करण्यात आली आहेत. निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पडावी, मतदारांनी अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी पोलीस दलाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे पालघर पोलिसांनी सांगितले.

बदलापूरमध्ये निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेसाठी मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण १ हजार ४९५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, सुमारे एक हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात शहरात घडलेल्या हाणामारीच्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शांततेत मतदान पार पाडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर होती. मात्र आता मंगळवारी होणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीकडे वळले आहे.

१० हजार ५४३ दुबार मतदार

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी शहरात एकूण २ लाख २५ हजार ३५५ मतदार नोंदवले असून, त्यात १ लाख ७ हजार ६८६ महिला मतदार, तर १ लाख १७ हजार ६५३ पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी १० हजार ५४३ दुबार मतदारांची नोंद आहे.

शहरात एकूण २४१ मतदान केंद्रे

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक विभाग मागील महिनाभर काम करत होता. शहरात एकूण २४१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा आणि व्यवस्थापन लक्षात घेता ३०६ ईव्हीएम मशीन या केंद्रांवर ठेवण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच पॅनल पद्धत आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान होत असल्याने, एका मतदाराला ३ मते देता येणार आहेत. तीन मतांसाठी सरासरी ९० सेकंद वेळ लागू शकतो, असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

१ हजार ४९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान केंद्रे आणि एकूण प्रक्रिया सांभाळण्यासाठी १ हजार ४९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

"या निवडणुकीसाठी एसआरपीएफचे २ अधिकारी आणि ५० कर्मचारी, ५५० पोलीस कर्मचारी, पीएसआय दर्जाचे ६० अधिकारी, ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २५० होमगार्ड, तसेच पेट्रोलिंगसाठी २१ मोबाईल पथके तैनात केली आहेत. शहरातील ३२ संवेदनशील ठिकाणी प्रत्येकी एक अधिकारी आणि पाच कर्मचारी उपस्थित राहणार आहे." - सचिन गोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४

मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजावावा; नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ११ नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान करता येणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा आपला अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा आणि कुंडलवाडी या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेष संकेतस्थळ कार्यरत

मतदारांना मतदार यादीतील आपले नाव सहज शोधता यावे म्हणून विशेष संकेतस्थळ https://mahasecvoterlist.inविकसित करण्यात आले आहे. संकेतस्थळावरील Search Name in Voter List या पर्यायावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकल्यावर मतदार यादीतील आपले नाव तपासता येईल.या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी होणार असून, सर्व प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

फडणवीस सरकार वर्षपूर्तीच्या तयारीत; पायाभूत सुविधा, गुंतवणूक वाढ, आघाडीतील समतोल ठरले केंद्रस्थानी

२० नेते निवडणूक आयोगाच्या रडारवर! प्रचार काळातील आमिष दाखवणारी वक्तव्ये भोवणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल

पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; २६४ नगरपालिका-पंचायतींच्या निव़डणुकीत महायुती-महाविकास आघाडीत चुरस, कुठे तणावाचे, तर कुठे कायदेशीर अडचणींचे सावट

दिल्ली, मुंबईसह अनेक विमानतळांवरील GPS सिग्नलच्या डेटामध्ये छेडछाड; केंद्र सरकारची संसदेत धक्कादायक माहिती

पहिल्याच दिवशी हंगामा; ‘SIR’ वरून लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब, राज्यसभेतही विरोधकांचा सभात्याग