मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पाचपैकी तीन मतदारसंघांतील उमेदवारांची रविवारी घोषणा केली. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी धुडकावून लावत भाजपने अनुक्रमे पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघात उमेदवार दिला आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघात मोठा बदल करत धक्कातंत्र अवलंबले असून, इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या शरद लाड यांच्याऐवजी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ : सुधाकर कोहळे यांना संधी दिली आहे. या जागेसाठी माजी आमदार अनिल सोले यांच्याही नावाची चर्चा रंगली होती. आता प्रा. अनिल सोले हेसुद्धा बंडखोरीच्या पवित्र्यात असून सोमवारी दुपारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
विधान परिषदेच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटची मुदत आहे. विधान परिषदेच्या पाचपैकी पुणे आणि अमरावती शिक्षक या दोन जागांसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर पुणे पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दावा केला होता. परंतु, भाजपने दोन्ही मित्र पक्षांची मागणी मान्य केली नाही. परिणामी शिंदे गटाला अमरावती शिक्षक आणि अजित पवार गटाला औरंगाबाद पदवीधर अशा एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
मंगेश चिवटे अर्ज भरण्यावर ठाम
शिवसेना शिंदे गटाने पुणे शिक्षक मतदारसंघासाठी स्वाभिमानी एकनाथ आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून शिंदे गटाचे मंगेश चिवटे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यात पुणे विभागातील शिक्षकांशी संपर्क वाढवला आहे. भाजपने या जागेवर उमेदवार दिला असला तरी शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा लढवण्यावर ठाम आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला आपण पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याचे चिवटे यांनी जाहीर केले आहे.
भाजपचे विधान परिषद उमेदवार
पुणे पदवीधर : डॉ. स्मिता योगेश जाधव
नागपूर पदवीधर : सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक : कौस्तुभ गावडे