विधान परिषद निवडणुकीचे नाट्य संपुष्टात; सर्व दहा जण बिनविरोध; पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज X (Devendra Fadnavis)
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीचे नाट्य संपुष्टात; सर्व दहा जण बिनविरोध; पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे आठ, तर महाविकास आघाडीचा एक अशा एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ९ जागांसाठी ९ उमेदवारांचे अर्ज आल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तसेच विधान परिषद पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज आल्याने तीदेखील बिनविरोध पार पडणार आहे.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे आठ, तर महाविकास आघाडीचा एक अशा एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ९ जागांसाठी ९ उमेदवारांचे अर्ज आल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तसेच विधान परिषद पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज आल्याने तीदेखील बिनविरोध पार पडणार आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या मुदतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेच्या मावळत्या उपसभापती डॉ. नीलम गोहे, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार झिशान सिद्दीकी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे तर भाजपच्या सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेना शिंदे गटाने डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी दिल्याने त्या सलग पाचव्यांदा विधान परिषदेवर जाणार आहेत. डॉ. गोहे या सन २००२मध्ये शिवसेनेच्या उमेदवार म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेल्या होत्या. मातोश्री'चा विश्वास संपादन केलेल्या गोहे यांना सलग चारवेळा विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यांनतर वर्षभराने डॉ. गोहे यांनीही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारले आणि विधान परिषदेचे उपसभापतिपद कायम राखण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विधान परिषदेतील निरोप समारंभाच्यावेळी ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची बक्षिसी म्हणून डॉ. गोहे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन वेळा बैठका घ्याव्या लागल्या. सलग दोन बैठकीनंतर गुरूवारी मुंबईतील माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सिद्दिकी हे माजी राज्यमंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. मुंबई काँग्रेसमधील नेत्यांशी मतभेद झाल्याने झिशान सिद्दीकी यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीने सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार

भाजप : सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार

शिवसेना शिंदे गट : डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू

राष्ट्रवादी अजित पवार गट : झिशान सिद्दीकी शिवसेना ठाकरे गट : अंबादास दानवे

विधान परिषद पोटनिवडणूक उमेदवार

भाजप : प्रज्ञा सातव

'प्रहार'च्या विलीनीकरणानंतरच कडूंना उमेदवारी

यापूर्वी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी कडू यांच्यासमोर त्याचा 'प्रहार जनशक्ती' हा पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी कडू यांनी 'नंदनवन' या शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेच कडू यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. कडूंना आमदारकीचे बळ देऊन शिंदे यांनी पश्चिम विदर्भात पक्ष विस्तारावर भर दिला आहे.

२०२८चा वायदा, काँग्रेसची माघार

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना चर्चा करण्याची साधी तसदीही न घेणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या विरोधात संताप व्यक्त करणाऱ्या काँग्रेसने गुरुवारी आपली भूमिका मवाळ केली.

ठाकरे गटाच्या नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात येऊन काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत २०२८ राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील जागांवर चर्चा झाली. चर्चेअंती काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी काँग्रेसच्या वतीने २०२८ मध्ये होऊ घातलेली राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत दोन जागा मिळाव्यात असा आग्रह धरला. २०२८ मध्ये विधान परिषदेच्या १०, मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या दोन जागा याशिवाय राज्यसभेचीही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने यापैकी दोन जागांची मागणी केली आहे. ठाकरे गटाच्या वतीने विधान परिषदेची जागा देण्याचे मान्य आणि तशी चर्चा काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेनंतर काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

विधान परिषदेचा उमेदवार निश्चित करताना ठाकरे यांनी काँग्रेसला गृहीत धरल्याने संतापलेल्या काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देण्याचे जाहीर केले होते. काँग्रेसच्या या पवित्र्याने निवडणुकीत अडचण होऊ शकते हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना पाठवले. खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि उमेदवार अंबादास दानवे यांनी गांधी भवन येथे येऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

विकासाच्या घोषणांआड दडलेली क्रूरता

बुद्ध पौर्णिमा-करुणेची पूर्तता

Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"; महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Buddha Purnima 2026 : सकाळची सुरुवात तथागत बुद्धांच्या सकारात्मक विचारांनी करा; दिवस जाईल आनंदी

मे महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य