छाया सौजन्य - X (@poojarypraveen)
महाराष्ट्र

राज्यात कोसळधार! विश्रांतीनंतर पावसाची दमदार बॅटिंग; मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यात ‘ऑरेंज अलर्ट’, रायगड, रत्नागिरीत ‘रेड अलर्ट’

राज्यात जवळपास दोन आठवडे आधीच मान्सूनने एंट्री घेतली असली तरी त्यानंतर मात्र काही काळ ब्रेक घेतला होता. आता रविवारपासून मुंबईत वरुणराजाचे आगमन झाले असून सोमवारी पावसाने दमदार बॅटिंग केली. सकाळपासून पावसाची संततधार कायम असल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.

Swapnil S

मुंबई : राज्यात जवळपास दोन आठवडे आधीच मान्सूनने एंट्री घेतली असली तरी त्यानंतर मात्र काही काळ ब्रेक घेतला होता. आता रविवारपासून मुंबईत वरुणराजाचे आगमन झाले असून सोमवारी पावसाने दमदार बॅटिंग केली. सकाळपासून पावसाची संततधार कायम असल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. रेल्वे वाहतूकही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या पडझडीच्या घटनेत चार जण जखमी झाले, तर राज्यात काही ठिकाणी वीज पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या. सिंधुदुर्गातील करुळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळही दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

सोमवारी सकाळी गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ रस्ता खचून पाच फूट पडलेल्या खड्ड्यात बेस्ट बस अडकली. क्रेनच्या सहाय्याने तत्काळ बसचे अडकलेले चाक बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये ३ ते ४ फूट पाणी साचले होते. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यावर तब्बल तीन तासांनी अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पुढील २४ तासांत राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’; तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सातारा, जालना या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले आहे. कोल्हापूर घाट, पुणे घाट, सातारा घाट यांनाही ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले आहे.

रविवारपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्यानंतर पावसाने सोमवारी सकाळी ११ वाजता चांगलाच जोर धरला. सोमवारी राज्यभरात पावसाची दिवसभर तुफान बॅटिंग सुरू होती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्याने झोडपून काढले. अनेक भाग पाण्याखाली गेले होते. संगमेश्वर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. वशिष्ठी, सावित्री नदीला पूर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. प्रशासनामार्फत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या स्थानिक यंत्रणांनी समन्वय साधून मदत करण्याच्या सूचना आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

कशेडी घाट, करुळ घाटात दरड कोसळली

कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्याचा मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या करुळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळी सुमारे ९ वाजता घाटमाथ्यावरून मातीचा मोठा मलबा आणि खचलेली दरड रस्त्यावर आली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लांजा येथील वाकेड घाटातही दरड कोसळली.

२४ तासांत १८ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. विविध कारणांमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर ६५ लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांतील सर्वाधिक पाऊस

रत्नागिरी - ११२.७ मि.मी.

सिंधुदुर्ग - ११०.७ मि.मी.

मुंबई शहर - १००.४ मि.मी.

मुंबई उपनगर - ८६.० मि.मी.

रायगड - ७२ .१ मि.मी.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video