आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज

ऐन सणासुदीच्या काळात साखरेने किलोमागे ८० रुपयांचा टप्पा ओलांडला असतानाच आता कांद्यानेही नागरिकांना रडवायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे दर २५ रुपयांवर ६० रुपये किलोवर पोहचले आहेत.

प्रतिनिधी

हारुन शेख / लासलगाव

ऐन सणासुदीच्या काळात साखरेने किलोमागे ८० रुपयांचा टप्पा ओलांडला असतानाच आता कांद्यानेही नागरिकांना रडवायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे दर २५ रुपयांवर ६० रुपये किलोवर पोहचले आहेत. येत्या दोन महिन्यात कांद्याचा दर ८० ते १०० रुपये किलो जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या साखर, कांद्याची मोठी दरवाढ झाल्याने नागरिकांचे दरमहाचे 'बजेट' पूर्णपणे कोलमडणार आहे.

यंदा पावसाला उशिरा झालेली सुरुवात आणि जुलैमध्ये अति पावसामुळे कांदा लागवडीवर झालेला विपरित परिणाम, या कारणांमुळे बाजारात कांद्याची आवक घटली. नवीन लाल कांदा काढणीला एक महिन्याचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांदा दरात तेजी आली आहे.

नाशिकचा लाल कांदा उशिराने

कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील कांदा ऑगस्टमध्ये बाजारात येतो आणि त्याची विक्री दक्षिण भारतात होते. कर्नाटकात पाऊस नसल्यामुळे त्या ठिकाणी ६० टक्के लागवड झाली आहे. तेथील कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात येईल. तर ऑक्टोबरमध्ये येणारा नाशिक जिल्ह्यातील लाल कांदा महिनाभर उशिराने येण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील कांदा नोव्हेंबरमध्ये बाजारात दाखल होईल, अशी परिस्थिती आहे. कांदा भावात आणखी सुधारणा होईल या आशेने चाळीत साठवलेला कांदा विक्रीसाठी शेतकरी विक्रीला बाहेर काढत नसल्याने कांद्याची आवक कमी झाल्याने भावात तेजी दिसून येत आहे.

चाळीतील कांदा झाला खराब

बाजारात शनिवारी कांद्याला प्रति क्विंटल किमान १००० रुपये, कमाल ४२८० रुपये तर सरासरी ३७०० रुपये दर मिळाला. सणासुदीच्या दिवसांत कांदा दरातील तेजी दीड ते दोन महिने कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. एप्रिल, मे महिन्यात उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटल १५०० ते २५०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने भविष्यात चांगला दर मिळेल या उद्देशाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या काळात चांगल्या प्रतीचा कांदा चाळीत साठविला. मात्र चाळीतील कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली. तसेच गेल्या काही दिवसांपासून कांदा दरामध्ये वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील लाल कांदा नोव्हेंबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. वकांद्याला सध्या समाधानकारक दर मिळत आहे. कांदा उत्पादकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे पुढील पीक अधिक जोमदार येण्यास मदत होऊ शकेल. कांदा पीक विलंबाचा परिणाम कांदा निर्यातीवर होत आहे.
विकास सिंग, उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना
एप्रिल मे महिन्यात चाळीत भरलेला कांदा सडला. त्यामुळे २५ ते ३० टक्के घट झाली मागणी आणि पुरवठ्याचे गणित कोलमडले. कांद्याला तेजी आली म्हणून शासनाने हस्तक्षेप थांबवून कांदा उत्पादकांना मुक्त पद्धतीने कांदा विकू द्यावा.
कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

Pune : मनुस्मृतीविरुद्ध एल्गार; राहुल गांधी यांनी 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात साधला हजारो तरुणींशी संवाद

आजचे राशिभविष्य, २३ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video