गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरात तब्बल ८३.७७ लाख एकर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेषतः मराठवाडा प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला असून छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, जालना या जिल्ह्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती पाहायला मिळाली.
६५४ महसूल मंडळांमध्ये नुकसान
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील तब्बल ६५४ महसूल मंडळांमध्ये पावसाने तडाखा दिला आहे. बीड, धाराशिव, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कृषिमंत्र्यांची प्रशासनला तंबी
परिस्थितीची गंभीर दखल घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या एक गुंठ्याचे मूल्यांकन जरी चुकले तरी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. शेतकरी खूप संकटात आहेत आणि प्रशासनाने कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी."
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील नुकसानाचेही मूल्यांकन
दरम्यान, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना प्रभावित स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन अचूक माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. मत्स्यपालकांच्या नुकसानीचे मूल्यांकन १० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
कॅबिनेट मंत्री पूरग्रस्त भागांचा आढावा घेत आहेत. मात्र विरोधी पक्ष सरकारवर दबाव आणत असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने पुढे येत आहे. यासोबतच पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही विरोधकांकडून होत आहे.