राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. २३ जिल्ह्यांतील ३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल ३,२५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही घोषणा मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केली.
राज्य सरकारने मागील दोन दिवसांत विविध ठरावांद्वारे शेतकऱ्यांसाठी ५,३६४ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. यापैकी मोठा हिस्सा अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागांना दिला जाणार आहे.
याआधी या आठवड्याच्या सुरुवातीला २१.६६ लाख बाधित शेतकऱ्यांसाठी १,३५६ कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. तसेच, या महिन्याच्या प्रारंभी ३१,६२८ कोटी रुपयांच्या भरपाई पॅकेजची घोषणा करून प्रति हेक्टर ४८,००० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि लगतच्या भागात मोठे नुकसान केले होते. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके पावसाने उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
विरोधकांनी मात्र सरकारच्या मदतीला 'तुटपुंजी आणि अपुरी' म्हणत टीका केली आहे. मात्र, राज्य सरकारचा दावा आहे की, शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी निधी थेट त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आणि पुनर्वसन प्रक्रिया जलदगतीने राबवली जाईल.