महाराष्ट्र

“दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवायची", रवींद्र चव्हाण यांची ही धमकी समजायची का?; आमदार निलेश राणे यांचा सवाल

कुडाळ-मालवण येथील शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या ‘२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे’ या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. राणे म्हणाले, हे विधान मित्रपक्षाला सरळसरळ दिलेली धमकी समजायची काय?..

Swapnil S

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण येथील शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या ‘२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे’ या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. राणे म्हणाले, हे विधान मित्रपक्षाला सरळसरळ दिलेली धमकी समजायची काय?. परवा मालवणमध्ये राणे यांनी केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन' संदर्भात पत्रकारांनी चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी केवळ ‘२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. नंतर बोलेन’ असेच विधान केले. यावर राणे यांनी कडवट प्रश्न विचारला.

यावेळी केनवडेकर यांच्या घरात सापडलेल्या २० लाख रुपयांच्या रोकडबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ती जप्त करून कोषागारात जमा केली असून, तपशीलवार अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक नियंत्रण समितीला पाठवला गेला आहे. राणे म्हणाले, संबंधित यंत्रणा ज्या पद्धतीने पावले उचलत आहे, त्याचा विचार करता आपण थेट न्यायालयात दाद मागणार आहोत. राणे यांनी दावा केला की, मालवण शहरातील ६-७ घरांमध्ये अजूनही मोठी रक्कम लपवलेली आहे. तसेच भाजपचे काही नेते आणि कार्यकर्ते पैशांचे वाटप करण्यासाठी निवडले गेले आहेत, असा आरोप शिंदे सेनेकडून केला जात आहे. मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत या चार ठिकाणी निवडणुका होत आहेत, ज्या ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचा आरोप राणे यांनी केला.

चव्हाण यांच्या प्रतिक्रिया बाबत बोलताना राणे म्हणाले, ही मित्रपक्षाला दिलेली धमकी समजायची काय? आजही मी माझ्या आरोपावर ठाम आहे. चव्हाण यांच्यावरचा माझा आरोप अजून कायम आहे, त्यांची माणसे यातून वाचणार नाहीत. त्यांनी भाजपच्या प्रतिक्रिया आणि रत्नागिरीचे पालकमंत्री, सिंधुदुर्ग संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर उपरोधिक टोला लगावला. राणे म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते पैशांच्या वाटपात इतके व्यस्त आहेत की त्यांना यावर लक्ष ठेवण्याचा वेळ नाही; काही कार्यकर्ते मिळालेल्या पैशातून कुठे फिरायचे, हॉटेल बुकिंग किंवा घरकामात गुंतल्यामुळे सामंत यांच्यावर लक्ष ठेवण्याचा वेळ नसतो.

मी परवानगी घेऊन प्रवेश केला

निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांनी केनवडेकर यांच्या घरातून रक्कम जप्त केली; ही गुन्हा असल्यास एफआयआर का दाखल नाही? केनवडेकर यांनी घरात प्रवेश हा गुन्हा असल्याचे म्हटले, परंतु राणे म्हणाले, “मी परवानगी घेऊन प्रवेश केला. पोलिसांना सर्व माहिती दिली असून, परवानगीची आवश्यकता नाही. ते पुढे म्हणाले, “केनवडेकर म्हणतात पैसे धंद्यातले आहेत, परंतु त्यांचा स्रोत उघड केला जावा. संपूर्ण व्यवहार स्पष्ट व्हायला हवा. शासकीय पातळीवर वेळ लागतो, पण यामध्ये वेळकाढूपणा झाला. पोलीस आणि निवडणूक यंत्रणा कोणाच्या दबावाखाली आहे का? याची तपासणी आवश्यक असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्ष रक्कम जप्त केली असून, केनवडेकर, बंड्या सावंत व श्री वेंगुर्लेकर यांच्या विरोधातही एफआयआर दाखल व्हावे अशी राणे मागणी करतात.

पैशांच्या आमिषाने निवडणुका जिंकता येत नाहीत

पैसे वाटून निवडणुका जिंकता येत नाहीत. लोकांची मने जिंकायची असतील तर विकासकामे करावी लागतात, असे स्पष्ट मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. मालवणमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणी निलेश राणे यांनी चुकीचे काहीही केलेले नाही, उलट ‘चोरी उघड केल्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे’, असे सरनाईक म्हणाले. कुठल्यातरी कार्यकर्त्याच्या घरी सर्वसामान्य मतदारांना आमिष दाखवून २५ लाख रुपये घेऊन वाटप सुरू असल्याची माहिती निलेश राणेंना मिळाली असेल. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच राहतात. परंतु लोकप्रतिनिधींच्या घरी पोलिसांनी अचानक घुसणे, रेड करणे योग्य नाही. आमदारांच्या घरी जाण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते. ती न घेता कारवाई होत असेल तर ते चुकीचे असल्याचे मत परिवहनमंत्र्यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी