छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात होणार बचत; प्रति किलोवॉट १५ हजारांचा होणार फायदा 
महाराष्ट्र

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात होणार बचत; प्रति किलोवॉट १५ हजारांचा होणार फायदा

महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या ५ लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे.

Swapnil S

मुंबई : महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या ५ लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॉटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे.

गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रति किलोवॉट पन्नास हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रति किलोवॉट सुमारे साठ हजार रुपये आकारत आहेत. पण महावितरणने आज मंजूर केलेल्या निविदेमध्ये प्रती किलोवॉट ४५,४५० रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॉटला तीस हजार रुपये, दोन किलोवॉटला साठ हजार रुपये व तीन किलोवॉटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. उर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एक किलोवॉटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येते व ग्राहकाला अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. राज्य सरकारने या योजनेत राज्यातर्फे आणखी अनुदान देऊन दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आणली आहे. प्रत्येकी एक किलोवॉटचे सौरऊर्जा प्रकल्प या योजनेत बसविण्यात येतील.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा