महाराष्ट्र

शाळेच्या नावांचा गोंधळ दूर होणार; नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास प्रतिबंध, शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी

शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यांसारखे शब्द वापरल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उडणारा गोंधळ आता थांबणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यांसारखे शब्द वापरल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उडणारा गोंधळ आता थांबणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा (सीबीएसई) किंवा आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यांसारखे शब्द वापरण्यास मनाई केली आहे.

मात्र, आय.बी., केम्ब्रिज, आय.जी.सी.एस. अशा आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा या मंडळांशी संलग्न होण्यास इच्छुक असलेल्या शाळांनाच केवळ या शब्दांचा वापर करता येईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

नव्या शाळांसाठी निर्णय लागू

-हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या शाळांनाच हा निर्णय लागू राहील. स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील नवीन शाळा मान्यतेचे प्रस्ताव पाठवताना शाळेच्या नावात पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे शब्द वापरत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नावावरून निर्माण होणारा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

-ख्रिस्ती धर्मसंघ, ख्रिश्चन नन्स समुदायाद्वारे संचलित करण्यात येणाऱ्या शाळांच्या नावामध्ये 'कॉन्व्हेंट' शब्द वापरता येईल. मात्र, अन्य संस्था, न्यास किंवा कंपन्यांद्वारे स्थापित करण्यात येणाऱ्या शाळांना शाळेच्या नावात 'कॉन्व्हेंट' या शब्दाचा वापर करता येणार नाही, असे विभागाने म्हटले आहे.

-सैनिकी शाळा म्हणून मान्यताप्राप्त शाळांनाच शाळेच्या नावात 'सैनिकी' शब्दाचा वापर करता येईल. संस्थांना ज्या शैक्षणिक मंडळाशी संलग्न होण्यासाठी शाळा स्थापन करायची आहे, अशा शैक्षणिक मंडळाचा उल्लेख शाळेच्या नावात करता येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार