मुंबई : यंदापासून राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ औपचारिक पालकसभा न ठेवता माता-पालकांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी घर आणि शाळा यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशा वर्षातून चार वेळा माता-पालक शैक्षणिक मेळाव्यांचे आयोजन सर्व माध्यमांच्या शाळांना करावे लागणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हा मेळावा प्रत्यक्ष शाळास्तरावर आयोजित करावा लागणार आहे. या उपक्रमाच्या आयोजनाची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर (एसएमसी) सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत कुटुंबाची आणि विशेषतः आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, नियमित उपस्थिती टिकवून ठेवणे आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी माता-पालकांचा शैक्षणिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार आखणी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि निपुण भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये वयानुरूप वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये विकसित करण्याला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच शैक्षणिक योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.
प्रश्न, अडचणी मांडण्याची संधी
मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या कमतरता किंवा त्रुटींवर नकारात्मक चर्चा करण्याऐवजी त्यांच्या अभ्यासातील चांगल्या बाबी अधोरेखित करून सकारात्मक संवादावर भर देण्यात येणार आहे. माता-पालकांना आपले प्रश्न, अडचणी आणि विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी देण्यात येईल.
नवा उपक्रम राबवणार
‘रोज २० मिनिटे मुलांसोबत’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पालकांनी मुलांशी त्यांच्या अध्यापनाबाबत संवाद साधावा, वाचन-लेखन, गोष्टींची पुस्तके, सवयी, आवडत्या-नावडत्या विषयांवर चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.
पालक, मुलांना चर्चेत सहभागी करून घेणार
मेळाव्यासाठी माता-पालकांना वैयक्तिक फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे निमंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संवादासाठी कठीण भाषा न वापरता साधी आणि स्थानिक भाषा वापरण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे.
अभ्यासाबरोबर आरोग्यालाही प्राधान्य
मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, मूल्यमापन पद्धती, परीक्षा वेळापत्रक, घरातील अभ्यासाचे वातावरण, वाचन संस्कृती, नियमित उपस्थिती, वर्तन आणि अध्ययनातील अडचणी यावर चर्चा केली जाईल तसेच विद्यार्थ्यांची गळती आणि गैरहजेरी रोखण्यासाठी पालकांशी समन्वय साधण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण, स्वच्छता, पौष्टिक आहार, सुरक्षितता, बालहक्क आणि बालसंरक्षण या विषयांनाही मेळाव्यात महत्त्व दिले जाणार आहे. शाळेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती, ध्येय, मूल्ये तसेच अपार आयडी, यूडीआयएसई आणि इतर आवश्यक शैक्षणिक नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबतही पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल.