मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जूनपासून ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक पर्याय निवडत एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही वर्षभर हा मोफत पास मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान, बस आगार बस पोर्ट झाली पाहिजेत. तसेच एसटीची कार्गो सेवा सुरू करण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या केल्या. एसटीची उत्पन्नवाढ, इंधन बचत, यावरही चर्चा झाली. जून २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना-नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पूर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल.
एसटीची कार्गो सेवा सुरू होणार
सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्यांसोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजेत. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजे. असे सांगत एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल याचा अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी परिवनह मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह पत्नीला मोफत प्रवास!
एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.